Tuesday, March 8, 2011

मानसिक स्वास्थ्य

मानसिक स्वास्थ्य

आजचे धावपळीचे जीवन, वाढती जीवघेणी स्पर्धा, वाढते ताणतणाव इ. अनेक बाबींमुळे अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांचे मानसिक स्वास्थ्य बिघडत चालले आहे.
मन म्हणजे काय असते, आपले मानसिक स्वास्थ्य योग, आयुर्वेद तसेच आधुनिक मानसशास्त्र यांची मदत घेऊन कसे टिकवता येईल याचा विचार मांडण्याचा प्रयत्न या लेखात केला आहे.

मन:
मनाची तुलना आपल्याला हवेशी करता येईल. हवा आपल्याला दिसत नाही पण जाणवते. शांत व संथ हवेमध्ये प्राणवायु असल्यामुळे ती तारक ठरते. तर गतिमान व वादळी हवेत विध्वंसक शक्ती असल्यामुळे ती मारक ठरते. त्याचप्रमाणे मनातही संहारक- संरक्षक, विध्वंसक- विधायक, प्रेरक- दाहक, बाधक- बोधक, उत्तेजक- शामक, तारक- मारक, सुप्त- स्फोटक अशा परस्परविरोधी शक्ती असतात.
मनात एकावेळी चांगली शक्ती असते आणि लगेच विरोधी शक्ती कार्यरत होऊ शकते. मनाच्या या संचाराला सीमा नाहीत. म्हणूनच बहिणाबाई मन वढाय वढाय असे म्हणतात. तसेच म्हणतात- अता होतं भुईवर मग गेलं आभाळात.
मन हे समजायला अतिशय गुढ आहे. मनाची गुढता सांगणारी एक सुंदर बोधदायक कथा आहे. ती अशी-
एक प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ होते. त्यांच्याकडे लांबून विद्यार्थी शिकायला येत. एक विद्यार्थी त्यांच्याकडे 3 वर्ष राहिला. सरांचा निरोप घेताना त्याने विचारले, सर, आज तरी सांगा मन म्हणजे नेमके काय ते. “What is mind?
सरांनी उत्तर दिले- “Mind means no matter.”
विद्यार्थ्याला समजले नाही. त्याने विचारले- “What is matter?”
सरांनी उत्तर दिले- “Matter means no mind.”
विद्यार्थी कोड्यात पडला. त्याने पुन्हा विचारले, “What is mind?”
सरांनी उत्तर दिले- “My Boy! Never Mind!!”
असे हे गुढ रहस्यमय मन.
आपण सिनेमात पाहतो. प्रियकर प्रेयसीला म्हणतो- मैने तुमको दिल दे दिया
पण शरीररचना व शरीरक्रियाशास्त्र यांच्या प्रगतीने हे सिद्ध केले की विचार व भावना ही कार्ये हृदयात होत नसून मेंदूत होत असतात. अर्थात मनाच्या व्याधी या मेंदूच्या क्रियेत होणार्‍या विकृती होत.

आधुनिक मानसशास्त्रानुसार मन-
मन हे मेंदुचे एक कार्य आहे. Working of the brain is called Mind.
मेंदुचे कार्य- (मानसिक)
बुद्धी, स्मृती, विचार प्रक्रिया, भावना, जाणीव, वर्तन, निर्णय प्रक्रिया, अंतदृष्टी आणि अवधान ही मेंदुची मानसिक कार्ये आहेत. Mind is one of the functions of the brain: Mental function include intelligence, memory, thinking, emotions, orientation, perception, behaviour, judgement, insight, attention, attitude.
आधुनिक मानसशास्त्रानुसार मनाचे तीन घटक असतात.
1)      इदम्- (Id) उपजत प्रेरणांचा संग्रह, Natural instinct or pleasure principle.
2)      अहम्- (Igo) इदम् च्या मागण्या व परम अहम् चे आदर्श यात समन्वय Reality or adjustment principle.
3)      परम अहम्- (Super Igo) आदर्श मुल्यानुसार उपजत प्रेरणांची निवड घडण संस्कारानुसार

योगशास्त्रानुसार मन-
 योगशास्त्रानुसार मन हे पारदर्शी, शुद्ध, रंगहीन व गुणरहित मानले जाते.
मन हे एखाद्या स्फटीकाप्रमाणे असते. स्फटीक मणी रंगीत वस्त्रावर ठेवल्यास तो वस्त्राप्रमाणे रंगीत दिसतो. मनदेखील ज्या विषयाशी, ज्या व्यक्तीशी, ज्या भोगाशी जोडले जाते तसे बनते.
मनाजवळ अणू उर्जेसारखी प्रचंड शक्ती असते. मनुष्याच्या उन्नतीला व अधोगतीला मनच कारणीभूत असते.

आयुर्वेद व अध्यात्मानुसार मन-
मनाची व्याख्या-
सुखादि उपलब्धि साधनम् मन: तच्च प्रति आत्मनियतत्वात अनन्तं परमाणुरूपं च नित्यं च॥ तर्कसंग्रह
सुख-दु:खादि भोगांच्या प्राप्तीचे साधन (इंद्रिय) म्हणजे मन होय. ते प्रत्येक जीवात्म्याबरोबर राहते त्यामुळे आत्म्याप्रमाणेच नित्य, अनंत, सुक्ष्म आणि परमाणुरूप असते.
पंचज्ञानेंद्रिय व पंचकर्मेंद्रियानंतर मन हे अकरावे इंद्रिय मानले आहे.

मनाची लक्षणे (एक प्रसंग):
मास्टर तुषार हा दहा वर्षाचा हुषार चुणचुणीत मुलगा होता. तो नियमित शाळेतही जात असे. परीक्षेचे दिवस जवळ आलेले होते. साहजिकच त्याच्या आईला त्याची चिंता वाटत होती. परंतु तुषारला त्याचे काही वाटत नाही. एकदा सायंकाळी दुरदर्शनची आवडती मालिका तो पाहत बसला होता. मालिका पाहताना त्याचा वेळ कसा गेला हे त्याला समजले नाही. आई त्याला आवाज देते तरी त्याचे लक्ष नव्हते. शेवटी त्याच्या पाठीवर आईचे धपाटे पडतात. तेव्हा तुषार भानावर येतो. आई म्हणते- बहिरा आहेस का रे? केव्हाची आवाज देतेय.
या प्रसंगाचे स्पष्टीकरण:
तुषार बहिरा नाही किंवा मुका नाही.
परंतु आईच्या आवाजाकडे त्याचे लक्ष नाही.
त्याने आईच्या आवाजाकडे मुद्दाम दुर्लक्ष केले नाही.
ही सगळी त्याच्या मनाची करामत आहे.
प्रत्येक व्यक्तीत मन एकच असते, सुक्ष्म असते. मन एकावेळी एकाच ज्ञानेंद्रियामार्फत ज्ञानाचा अनुभव करत असते.
तुषार मन लावून डोळ्यांनी टीव्ही पाहत होता. त्याच्या अन्य ज्ञानेंद्रियांचा मनाशी संबंध नव्हता. त्यामुळे आईने आवाज देऊनही त्याला ऐकू आले नाही त्यामुळे त्याला मार खावा लागला.
या प्रसंगाचे शास्त्रीय विवेचन:
लक्षणं मनसो ज्ञानस्याभावो भाव एव च्।
सतिह्यात्मेंद्रियार्थानां सन्निकर्षे न वर्तते॥
वैवृत्यान्मनसो ज्ञानं सान्निध्यात्त्च्यवर्तते।
अणुत्वमथ चैकत्वं द्वौगुणौ मनस: स्मृतौ॥" चरक शा.1
अर्थ: एकाच वेळी ज्ञान होणे व न होणे हे मनाचे लक्षण आहे. आत्मा, इंद्रिय व विषय या तिहींचा संयोग हा जर मनासहित असेल तर त्या व्यक्तीस त्या विशिष्ट विषयाचेच ज्ञान होते व संयोग जर मनाविरहीत असेल तर ज्ञान होणार नाही. अणुत्व व एकत्व हे मनाचे 2 गुण आहेत.

मनाची कार्ये:
मन- भारतीय संकल्पना-
'मने ज्ञाने बोधे' म्हणजे ज्याच्या साहाय्याने आपल्याला ज्ञान होते, बोध होतो ते.
'मन्यते बुध्यते अनेन इति मन:'
मनन, चिंतन, संकल्प, विकल्प करणारे ते मन.
ऋग्वेदात मनाचा उल्लेख पंचज्ञानेंद्रिये व पंचकर्मेंद्रियावर नियंत्रण ठेवणारे अंत:करण असा केला आहे.
आहे.
श्री शंकराचार्यांनी मन, बुद्धी, अहंकार व चित्त असे अंत:करण चतुष्टय मांडले आहे.
श्री गोरक्षनाथांनी सिद्ध सिद्धांत पद्धतीत मन, बुद्धी, अहंकार, चित्त व चैतन्य असे अंत:करण पंचक दिले आहे.
वशिष्ठ ऋषींनी प्रत्येक प्राण्याला दोन शरीरे आहेत- अस्थिमांसमय देहरुपी स्थूल शरीर व मनोरुपी सुक्ष्म शरीर असे प्रतिपादन केले आहे.

मनाचे 3 गुण-
सत्व- सुख देणारा, मनाचा गुण. निर्मलता, प्रसन्नता, ईश्वराकडे नेणारा गुण
रज- मनाचा दोष, कृतिशील, उत्साही, दुराग्रही, रागीट, चंचल.
तम- मनाचा दोष, भ्रांती, दुर्बोधता, अज्ञान, आळस, सुस्ती, असुरत्वाकडे नेणारा.
सांख्यांनी सर्व सृष्टी त्रिगुणात्मक असते असे सांगितले आहे.
कृतिशील रज जर सत्वाच्या पाठीमागे गेले तर ईश्वराकडे नेते आणि ते तमा मागोमाग गेले तर असुरत्वाकडे नेते.

मनाच्या 3 शक्ती-
धी- बुद्धी
धृती- धैर्य
स्मृती- स्मरणशक्ती


अंतःकरण-चतुष्ट्य :
 अंतःकरण-चतुष्ट्य हा सूक्ष्म देहाचा घटक आहे. अंतकरण-चतुष्ट्य हा शब्द म्हणजे तीन संस्कृत शब्द एकत्र येऊन बनलेला एक समास आहे. त्यामध्ये अंतः (अंतर), करण आणि चतुष्ट्य अशी तीन घटक पदे आहेत. अंतर हा शब्दाचा अर्थ आहे आत किंवा आतील. करण या शब्दाचा इंद्रिय हा अर्थ अपेक्षित आहे. चतुष्टय म्हणजे (कोणत्याही) चार गोष्टींचा-समूह. म्हणून अंतःकरण-चतुष्ट्य  म्हणजे 'आतील चार इंद्रियांचा समूह' असा अर्थ होतो. येथे 'आतील' शब्दाने काय सूचित होते हेही लक्षात घ्यावयास हवे. डोळा, कान इत्यादि पाच ज्ञानेंद्रिये ही बाहेरील शब्द, स्पर्श, इत्यादि पाच विषयांच्या संनिकर्षात येतात आणि ज्ञानाची सामग्री अंतःकरणाला पुरवितात. अंतःकरण हे कर्मेद्रियांनाही प्रेरणा देते. कर्मेंद्रिये ही सुद्धा बाह्म विषयांशी संबंधित होतात. या ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिये यांच्याप्रमाणे अंतःकरण मात्र बाह्य विषयांशी साक्षात्पणे संबंधित
होत नाही. ते सूक्ष्म शरीरात राहून आपले कार्य करते. म्हणूनच त्याला अंतःकरण म्हणतात.
    पाच ज्ञानेंद्रियाद्वारा आलेल्या संवेदनांचे चिंतन, पृथक्करण, संयोगीकरण, निर्धारण इत्यादि करण्याचे काम अंतर इंद्रिय अथवा अंतःकरण करते. त्यामुळे त्या त्या कार्याला धरून अंतःकरणाचे कधी दोन, कधी तीन तर कधी चार भाग मानले जातात. मन, चित्त, बुद्धी आणि अहंकार असे हे चार भाग आहेत.
रामदासस्वामींनी दासबोध या ग्रंथात अंतःकरण पंचक सांगितले आहेत.
1) अंतःकरण, 2) मन, 3) चित्त, 4) बुद्धी आणि 5)अहंकार
अंतःकरण हे नाभीच्या ठिकाणी परा वाचेचे स्थानी असते
(नाभीस्थानी परा वाचा । तोची ठाव अंतःकरणाचा ॥ दास.१७.८.३).
आठवण असताना उगीचच जे निर्विकल्प स्फुरण होते, त्याला अंतःकरण म्हणतात
(निर्विकल्प जें स्फुरण । उगेच असता आठवण । तें जाणावें अंतःकरण । जाणती कळा ॥ दास. १७.८.४).
याचा अर्थ असा दिसतो की ज्ञानेंद्रियद्वारा बाह्य संवेदना येत नसताना, ज्याला स्मृतिरूप ज्ञान होते, ते अंतःकरण होय.
अंतःकरणात आठवण आल्यावर पुढे ''आहे नाही'' असे वाटते, ''करावे न करावे'' असे वाटते; हे ज्याला वाटते ते मन.
(अंतःकरण आठवलें । पुढें होय नव्हेसें गमलें । करुं न करुं ऐसें वाटलें । तेंचि मन ॥ दास. १७.८.५).
म्हणजे संकल्प आणि विकल्प करणे हे मनाचे स्वरूप आहे. (संकल्प विकल्प तेंचि मन ॥ दास.१७.८.६).
याचा भावार्थ असा : - अंतःकरणात स्मृति जागृत झाली असताना किंवा इंद्रियाच्या मार्फत संवेदना आली असताना, 'हे असे आहे, हे असे नाही', हे करावे, हे करू नये', अशी जी दोलायमान वृत्ति तिला मन म्हणतात. या वृत्तीत निश्चितपणा नसतो; ''हे'' की ''ते'' असा संदेह असतो; म्हणून मन संकल्प विकल्प करते असे म्हणतात. यासाठीच 'संकल्प-विकल्पात्मकं मनः' अशी मनाची व्याख्या संस्कृतमध्ये दिली जाते. संक्षेपाने सांगायाचे झाल्यास, निश्चितपणाच्या अभावी, संशयात असणारी द्विधा वृत्ती म्हणजे मन.
    मनाची दोलायमान स्थिती दूर होऊन जर तेथे एखादा निश्चय झाला, तर ती संशयग्रस्त द्विधा स्थिती संपते. उदा. ''अमुक गोष्ट अशी अशीच आहे'', ''ते तसेच आहे'', 'हे करायचे आहे आणि ते करायचे नाही', अशाप्रकारचा निश्चय होतो. हे निश्चय करण्याचे कार्य करणार्‍या वृत्तीला बुद्धी असे म्हणतात.
(पुढे निश्चयो तो जाण । रूप बुद्धीचे ॥ दास. १७.८.६)
म्हणजे ''एखादी गोष्ट मी करीन, दुसरी करणार नाही'', अशाप्रकारचा निश्चय करणारी बुद्धी असते.
 (करीनचि अथवा न करीं । ऐसा निश्चयोचि करी । तेचि बुद्धि हे अंतरी । विवेकें जाणावी ॥ दास. १७.८.७).
 थोडक्यात, निश्चय करते ती बुद्धी, म्हणून ''निश्चयात्मिका बुद्धिः'' अशी बुद्धीची व्याख्या संस्कृतमध्ये दिली जाते. निश्चय म्हणजेच अध्यवसाय. म्हणून ''अध्यवसायात्मिका बुद्धिः'' असेही म्हटले जाते.
    निश्चयानंतर ज्या गोष्टीचा निश्चय झाला आहे, त्या गोष्टीचे चिंतन सुरू होते. हे चिंतन करण्याचे कार्य जे करते, ते चित्त होय. (जो वस्तूचा निश्चयो केला । पुढे तेचि चिंतू लागला । ते चित्त बोलिल्या बोला । यथार्थ मानावें ॥ दास. १७.८.८).
म्हणजे निश्चित झालेल्या गोष्टीवर चिंतन करणारे चित्त होय. म्हणून चिंतन करते ते चित्त (चिंतयति इति चित्तम।), असे म्हटले जाते.
    त्यानंतर ज्या कार्याचा निश्चय झाला आहे व ज्या कार्यावर चिंतन झाले आहे, त्या कार्यावर अभिमान धारण करणारी वृत्ति निर्माण होते; तिलाच अहंकार म्हणतात. ''अमुक अमुक कार्य माझे आहे, ते मला करावयास हवे'' असा अभिमान बाळगणारे अंतरिंद्रिय म्हणजे अहंकार होय.
 (पुढे कार्याचा अभिमान धरणें । हे कार्य तो अगत्य करणें । ऐसा कार्यास प्रवर्तणें । तोचि अहंकार ॥ दास. १७.८.९).
मी मला, माझे या शब्दांनी अहंकार व्यक्त होतो. ''मी श्रीमंत आहे, मी बलवान आहे; मला द्रव्य पाहिजे आहे, मला सुंदर स्त्री पत्‍नी म्हणून हवी; माझी मोठी इस्टेट आहे, माझी मुलेबाळे आहेत;'' इत्यादि स्वरूपात अहंकार व्यक्त होत असतो.
थोडक्यात अंत:करण चतुष्टय-
मन- मन्यते अनेन इति मन:।
मनन, विचार, उलट सुलट संकल्प विकल्प करते ते मन. हे मन पंचज्ञानेंद्रियातील दुवा असते.
बुद्धी- योग्य अयोग्य यांचा निश्चय करणारी ती बुद्धी.
अहंकार- 'स्व' ची किंवा 'मी' पणाची जाणीव
चित्त- चिंतन, अनुभव करते ते चित्त. पतंजलींनी मनाला चित्त असे म्हटले आहे.
योगाची व्याख्या 'योग: चित्तवृत्ती निरोध:' अशी त्यांनी सांगितली आहे.
चित्ताचे 5 प्रकार-
मूढ- आळशी, निरूत्साही
क्षिप्त- चंचल, अस्थिर
विक्षिप्त- भोगासाठी प्रयत्नशील
एकाग्र- स्थिर, निश्चयी, एका दिशेने प्रयत्नशील.
निरूद्ध- सर्व वृत्तींचा लोप झालेली स्थिती- समाधी अवस्था

मनाच्या रचनेचे तीन स्तर-
जागृत मन, सुप्त मन, अर्धजागृत मन
जागृत मन- (conscious) व्यावहारीक स्तर, जाणीवेच्या एकूण क्षेत्रापैकी 1/10 भाग
अर्धजागृत मन- (preconscious) सुप्त मनाचा भाग, यातील स्मृती आठवता येतात.
सुप्त मन (अचेतन स्तर) (unconscious)- जाणीवेपलिकडील क्षेत्र- 9/10 भाग, यातील स्मृती व ठसे आठवत नाहीत. निरोगी व मनोविकारग्रस्त दोन्हींमध्ये प्रभावी. व्यक्तिमत्वातील दाबलेल्या दडपलेल्या आवश्यकता या भागात जातात व नंतर मनोविकारांना जन्म देतात.

भारतीय तत्वज्ञानानुसार मनाच्या 4 अवस्था-
1)      जागृती- पंचेंद्रियांद्वारा ज्ञान
2)      स्वप्न- अर्धचेतन अवस्था, स्मृती आठवतात.
3)      सुषुप्ति- सुप्त अवस्था, गाढ निद्रा, स्मृती आठवत नाहीत.
4)      तुरीयावस्था- दिव्यचेतन अवस्था

मन:स्वास्थ्य :
जागतिक आरोग्य संघटनेनुसार स्वास्थ्य म्हणजे केवळ रोग नसणे नसून शरीर व मनाची सुस्थिती असणे होय. यापैकी मनाची सुस्थिती असणे म्हणजेच मानसिक स्वास्थ्य होय.
बदलते वातावरण, वेगवेगळ्या समस्या यामधून मार्ग काढून ही सुस्थिती राखता येते.
मानसिक दृष्टया स्वस्थ व्यक्तींचा भावनात्मक, सृजनात्मक, बौद्धिक व आध्यात्मिक विकास होतो व ते व्यक्ती आपल्या क्षमतांचा वापर समाज व मानवकल्याणासाठी करू शकतात.

मन:स्वास्थ्या ची भारतीय संकल्पना:
भारतीय धारणेनुसार मानसिक दृष्टीने संतुलित व्यक्तिमत्व हे अंतरंगात व बाहेरच्या विश्वाशी सुसंवाद साधत असते.
भगवद्गीतेमध्ये हीच गोष्ट स्थितप्रज्ञ लक्षणांमध्ये सांगितली आहे-
दु:खेष्वनुद्विग्नमना: सुखेषु विगतस्पृह:।
वीतराग भय क्रोध: स्थितधीर्मुनिरूच्यते॥
य: सर्वत्रानभिस्नेहस्तत्तत्प्राप्य शुभाशुभम्।
नाभिनन्दति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता॥  - गीता 2.56,57
जो दु:खामुळे उद्विग्न होत नाही, आनंदातही बेभान होत नाही, भय, मोह, क्रोध यांनी विचलित होत नाही, स्नेहपाशात गुरफटत नाही, शुभाशुभ कुठल्याही गोष्टीमुळे हुरळत नाही आणि द्वेषही करत नाही तो व्यक्ती स्थितप्रज्ञ असतो.
भारतीय चिंतनात स्वस्थ मन हे जीवनाचे अंतिम ध्येय गाठण्याचे एक साधन आहे. व्यक्तीच्या परीपूर्ण विकासाचे एक माध्यम आहे, चैतन्याच्या प्रकटीकरणाचे उपकरण आहे.

आधुनिक मानसशास्त्रात अमेरिकन मानसिक स्वास्थ्य संघटनेने मानसिक स्वास्थ्याचे काही निकष सांगितलेले आहेत.
‌‌- भावनात्मक स्थैर्य
-         चारित्र्यातली परिपक्वता
-         जीवनात होणार्‍या आघातापासून स्वत:ला लवकरात लवकर सावरण्याची क्षमता
-         दूरदृष्टी
-         अन्य व्यक्तीवर प्रेम करण्याची व सौहार्दपूर्ण संबंध स्थापित करण्याची क्षमता
-         नैसर्गिक गरजा स्वत:ला किंवा इतरांना न दुखावता पूर्ण करण्याची क्षमता
-         प्रभावी सद्सद्विवेक बुद्धी असणे
आधुनिक मानसशास्त्राप्रमाणे स्वस्थ मन हे यशस्वी जीवनासाठी व निरोगी व्यक्तीमत्वासाठी आवश्यक मानले आहे. आहे. म्हणून भारतीय दृष्टीकोन हा अधिक व्यापक, सखोल व मूलगामी आहे.

मन:स्वास्थ्य कसे बिघडते?
पाच ज्ञानेंद्रिये व पाच कर्मेंद्रिये यांच्यावर नियंत्रण ठेवणारे अकरावे इंद्रिय मन असते. आयुर्वेदानुसार मनाचा सत्व गुण कमी झाला आणि रज व तम हे दोष वाढले तर धी, धृती व स्मृती या मानसशक्ती दुर्बल होतात. मनाचा अनिष्ट इंद्रिय विषयांशी संयोग होतो.(असात्म्य इंद्रियार्थ संयोग)
  आणि शारीरिक व मानसिक व्याधी होतात. उदा. उन्माद, अपस्मार, मुर्च्छा, मोह इ.
धी- योग्य अयोग्य निर्णय घेऊन प्रेरणा देणारी शक्ती
धृती- धैर्य (धी च्या निर्णयाप्रमाणे आचरण करण्याची तयारी)
स्मृती- याच आचरणात सातत्य राहण्यासाठी त्याचे स्मरण राहणे.
धी, धृती व स्मृती यांचा भ्रंश झाल्यास मन:स्वास्थ्य कसे बिघडते हे खालील उदाहरणावरून लक्षात येईल.
एखाद्या व्यक्तीला व्यसन कसे जडते याचा विचार केल्यास सुरुवातीला त्याच्या मित्रांनी दिलेल्या प्रलोभनामुळे त्याची धी भ्रंश होते. बुद्धीने योग्य निर्णय जरी दिला तरी तात्पुरते बरे वाटणार्‍या आकर्षणामुळे निर्णय अंमलात आणण्याचे धैर्य नसते त्यामुळे धृती भ्रंश होतो. त्याचे व्यसन चालूच राहिल्यामुळे जरी शरीरावर दुष्परिणाम झाले तरी पूर्वीच्या दुष्परिणामांची विस्मृती होते आणि स्मृतिभ्रंश होतो. अशा रितीने धी, धृती आणि स्मृतीभ्रंश झाल्याने प्रज्ञापराध घडतो आणि मन:स्वास्थ्य बिघडते.
मन:स्वास्थ्य का बिघडते?- गीता
ध्यायतो विषयात्पुंस: संगस्तेषूपजायते।
संगात्संजायते काम: कामात्क्रोधोभिजायते॥
क्रोधात्भवती संमोह: संमोहात्स्मृतिविभ्रम:।
स्मृतिभ्रंशाद् बुद्धिनाशो, बुद्धिनाशात्प्रणश्यति॥ गीता 2.62,63
विषयांचा विचार, आसक्ती, कामना यात विघ्न आले तर क्रोध निर्माण होतो. क्रोधामुळे अविवेक निर्माण होऊन स्मरणशक्ती भ्रष्ट होते. त्यामुळे बुद्धीनाश होतो आणि जीवनाचा सर्वनाश होतो.

मन:स्वास्थ्य का व कसे बिघडते? (योगशास्त्रानुसार)
आपले अंत:करण आकाश, वायू, तेज, आप आणि पृथ्वी या पंचमहाभूतांच्या सत्वांशापासून उत्पन्न होतात. आपल्या अंत:करणाच्या पाच वृत्ती असतात- प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा व स्मृती.
या वृती मनुष्याला विषयांकडे खेचून नेतात. या वृत्तींमुळे पंचक्लेश निर्माण होतात- अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश. हे क्लेश निर्माण झाल्यामुळे आपले मन:स्वास्थ्य बिघडते. यावर उपायही योगशास्त्रात वर्णित आहेत.
पतंजलींनी मनोविकारांना 'चित्तविक्षेप' असे नाव दिले.
हे चित्तविक्षेप 9 प्रकारचे असतात- व्याधि, स्त्यान, संशय, प्रमाद, आलस्य, अविरति, भ्रांतिदर्शन, अलब्धभुमिकत्व आणि अनवस्थितत्व.
या मानसिक चित्तविक्षेपामुळे शारीरिक परिणामही दिसतात. याला 'विक्षेपसहभूव' असे म्हटले आहे. (विक्षेपाचे साथीदार) हे विक्षेपसहभूव चार प्रकारचे असतात- दु:ख, दौर्मनस्य, अंगमेजयत्व, श्वास-प्रश्वास.
हे 9 प्रकारचे चित्तविक्षेप व 4 प्रकारचे विक्षेपसहभूव दूर करण्यासाठी उपाय सांगितला आहे-
"तत्प्रतिषेधार्थमेक-तत्वाभ्यास:।" यो.सू. 1-32
तसेच "मैत्रीकरूणामुदितापेक्षाणी सुख दु:ख पुण्यापुण्यविषयानां भावनात्श्चित्त्प्रसादनम्।"
या 13 प्रकारांना दूर करून ध्यान-समाधि अवस्था प्राप्त करून मन एकाग्र करण्याचा विधी सविस्तर सांगितला आहे.
मैत्री- जे सुखी व्यक्ती आहेत, जे संकटकाळात मदतीस येतात, जे आपल्यापेक्षा ज्ञानाने, भक्तीने, सत्कर्मामध्ये श्रेष्ठ आहेत अशांशी मैत्री करावी.
करूणा- जे दु:खी आहेत, जे आपल्यापेक्षा ज्ञानाने, भक्तीने, सत्कर्माने कमी आहेत अशांना करूणा दाखवावी.
मुदिता- मुद् म्हणजे आनंद. दुसर्‍याच्या आनंदात आपला आनंद मानावा. अनेकजण आनंदित होतील असे कृत्य करावे.
उपेक्षा- जे पापी, दुष्ट व्यक्ती आहेत त्यांचा द्वेषही करू नये तसेच त्यांच्याशी मैत्रीही करू नये तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करावे.
वरील सर्व मन प्रसन्न करण्याचे उपाय आहेत.

मन:स्वास्थ्य का व कसे बिघडते? (आधुनिक मानसशास्त्रानुसार)

सिगमंड फ्राईड- 
बालपणी दडपल्या गेलेल्या इच्छाआकांक्षा, व्यक्तीगत जीवनमुल्ये व प्रेमपूर्ण संबंधातील अडथळे यामुळे मनोविकार होतात.
एकदा भारतीय मानसशास्त्रज्ञ फ्राईड यांना भेटायला गेले व त्यांना म्हणाले- आपण एवढया मानसोपचार पद्धतींचा शोध लावलात. परंतू मानसरोग होऊ नये म्हणून काय करता येईल?
त्यावेळी फ्राईड म्हणाले- असा उपाय माझ्या शास्त्रात नाही तो तुमच्या पातंजलसुत्रामध्ये आहे.
या प्रसंगातून भारतीय तत्वज्ञानाची श्रेष्ठता प्रत्ययास येते.

एरिकसन-
एरिकसनच्या सिद्धांतानुसार मानवी विकासाच्या प्रक्रियेत अडथळे आल्यामुळे मनोविकार निर्माण होतात.

मॅस्लो-
शारीरिक गरजा, सुरक्षितता, प्रेमपूर्ण सामाजिक संबंध, आत्मसन्मानाची ईच्छा, स्वत:च्या क्षमतांची अभिव्यक्ती या मुलभूत आवश्यकतांची पूर्ती ना झाल्याने वा अपयशाने मनोविकार होतात.

जैविक (Biological) व बाह्य (Environmental) अशा दोन वर्गातल्या मनोविकार उद्भवण्यामागील कारणांचा समावेश आजचे मानसशास्त्र करते.
जैविक कारणे-
-         अनुवांशिकता, नैसर्गिक बदल (पौगंडावस्था, रजोनिवृती)
-         मेंदूचे विकार, आघात, जंतुसंसर्ग.
-         जैवरासायनिक, चयापचयात्मक, अंत:स्त्रावी ग्रंथीजन्य.
-         औषधींचे दुष्परिणाम, रासयनिक पदार्थ, मद्य.
-         मानसिक ताण- बालवयातील, शिक्षणातील, कौटुंबिक, व्यावसायिक, सामाजिक, लैंगिक, आर्थिक, धार्मिक, राजकीय स्थलांतरामुळे निर्माण झालेले.
बाह्य कारणे-
-         भौतिक वातावरण
-         पर्यावरण
-         सामाजिक, सांस्कृतिक कारणे
-         मानसशास्त्रीय कारणे
-         परिस्थितीजन्य कारणे

मन:स्वास्थ्य बिघडल्यास आयुर्वेद उपचार-
आयुर्वेदाने मनोविकार होऊ नये व झाल्यास काय उपाययोजना करावी याचे सविस्तर विवेचन दिले आहे.
मनोविकार होऊ नये म्हणून-
1)      मानसिक वेगांचे धारण करावे- उदा. लोभ, क्रोध, शोक, मोह, मद, मत्सर, अहंकार, द्वेष इ.
2)      असत्य भाषण, चोरी, हिंसा, परीग्रह यांचा त्याग करावा.
3)      सद् वृत्त पालन करावे. यामुळे सत्वगुणाची वाढ होते आणि रज व तम हे मनाचे दोष कमी होतात. यालाच आचार रसायन असे म्हटले आहे.

मनोविकार झाल्यावर चिकित्सा-
1)      दैवव्यपाश्रय चिकित्सा- यम, नियम, मंत्र, औषधी धारण, रत्न धारण, चांगले कर्म, दान, यज्ञ, प्रायश्चित्त, उपवास, तीर्थाटन इ.
2)      युक्तिव्यपाश्रय चिकित्सा- औषधी, आहार, पंचकर्म, पथ्यापथ्य, आसने, प्राणायाम, षटकर्म उदा. त्राटक, कपालभाती इ.
3)      सत्वावजय चिकित्सा- शवासन, ॐ कार ध्यान, दीर्घ श्वसन, योगनिद्रा, प्रत्याहार, धारणा, ध्यान, यम, नियम इ.

योगसाधनेतून मन:स्वास्थ्य-
अष्टांग योगापैकी यम, नियम, आसन व प्राणायाम यामुळे मन शुद्ध होते. धारणा, ध्यान व समाधी यामुळे मन समाधीस्थ होते. ते ईश्वराशी तादात्म्य पावते.
योगाची व्याख्या सांगताना 'चित्तवृत्ती निरोध' अशी सांगितली आहे. या चित्तवृत्तींचा निरोध केल्याने मन:स्वास्थ्य प्राप्त होते.
याशिवाय काही आसने, प्राणायाम मन:स्वास्थ्यासाठी उपयोगी ठरतात-
शशांकासन, शवासन, हस्तपादासन, वीरासन, सिद्धासन, शीतली प्राणायाम इ.
हठयोग, राजयोग, भक्तीयोग, ज्ञानयोग, मंत्रयोग इ. अनेक योगमार्गांनी चंचल मन स्थिर होते.

काही मनोविकारात योगसाधनेमुळे विशेष लाभ होतो.
अतिचिंता (Anxiety), उद्विग्नता (Depression), नैराश्य (Frustration), निद्रानाश (Insomnia), तापटपणा, चिडखोरपणा, अकारण भिती (Phobia), द्विधा मन:स्थिती(Indecisiveness), विचित्र मन:स्थिती (Schizophrenia) इ. आजारांमध्ये सिद्धासन, शीर्षासन, सर्वांगासन, शांभवी, उन्मनी मुद्रा, साक्षीभावना, भ्रामरी, उज्जायी, मुर्च्छा प्राणायाम, प्राणधारणा, त्राटक, योगनिद्रा, प्रत्याहार, नादानुसंधान, ॐ कार जप इ. योगप्रकारांमुळे खूप लाभ होतो.

कपालभातीमुळे सुक्ष्म मल दूर होतात.
अंत:करणादि सुक्ष्म इंद्रियांशी संलग्न असलेले व रज, तम गुणांना बलवान करणारे वासना, लोभ, मोह, अहंकार, क्रोध, मद, मत्सर, ईर्षा, द्वेष, घृणा, तिरस्कार, असुया, हेवा इ. सुक्ष्म मळ दूर करते.

हठयोगप्रदीपिकेत म्हटले आहे-
चले वाते चलं चित्तं निश्चले निश्चलं भवेत्।
योगी स्थाणुत्वमाप्नोति ततो वायुं निरोधयेत्॥
प्राणवायु चंचल, अस्थिर असेल तर चित्तही चंचल, अस्थिर असते. प्राणायामाच्या साहाय्याने वायुनिरोध केल्यास चित्त स्थिर होते व योगी एकाग्र अवस्थेत जातो. त्याला स्थाणुत्व प्राप्ती होते.

आपले मन प्रसन्न असेल तर आपले आरोग्य चांगले राहते. मन चंचल, अस्थिर असल्यास आपली कार्यक्षमता कमी होते. म्हणुन योगशास्त्रात मन प्रसन्न ठेवण्याची गुरुकिल्ली असलेले खालील उपाय सांगितले आहेत- एकांतवास, लघुभोजन, मौन, निराशा, करणावरोध व असो:संयमन.

मनाचे नियंत्रण
मनुष्याची सर्वात मोठी समस्या मन आहे. शरीर नाही. शरीराला जेवढे आजार होतात त्यामध्ये 80% आजारात मनाचा सहभाग निश्चित असतो. काही आजारात तर तो 100% असतो. गीतेमध्ये अर्जुनाने कृष्णाला म्हणतो- चंचलं हि मन: कृष्ण:।

चंचलता हा मनाचा स्वभाव आहे. मनाचे स्थिर, निश्चल होणे अवघड आहे. मनाची एकाग्रता तर अजून अवघड आहे.
संत कबीरदास म्हणतात- 'मै उन संतन का दास जिन्होंने मन मार लिया।'
ज्यांनी मनाला वश करून घेतले ते देव होतात. राम व कृष्णांनी मनाला वश करून घेतले होते.
मनाला वश करणे योगाचे, भक्तिचे, मानवी जीवनाचे लक्ष्य मानले जाते.
मन एकटे काही करू शकत नाही. ते विद्युतशक्तीसारखे असते. विद्युत आहे परंतू बल्ब नाही किंवा तार नाही तर काही फायदा नाही. त्याचप्रमाणे मन आहे पण त्याच्या अभिव्यक्तीसाठी इंद्रिये नाहीत तर ज्ञान नाही. पंचज्ञानेंद्रिय व पंचकर्मेंद्रिय यांच्या माध्यमातून मनाची अभिव्यक्ती होते, म्हणून इंद्रियांना मनाचे उपकरण मानतात. या इंद्रियांना व्यस्त ठेवण्यासाठी कर्मयोग सांगीतला आहे.
वेदातही इंद्रियांचे कार्य चांगले राहावे म्हणून देवाला प्रार्थना केलेली आहे.
'ॐ भद्रं कर्णेभि: श्रुणुयाम देवा: भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्रा:'   
माझ्या कानाला चांगले ऐकू दे, माझ्या डोळ्यांना चांगले दिसू दे. त्यांना कर्मरत राहू दे.
वातावरणात ज्याप्रमाणे हवेचा दाब कमी जास्त झाल्याचे आपण ऐकतो त्याचप्रमाणे आपल्या मनावरही दबाव, दडपणे दैनंदिन व्यवहारात येत असतात. असे दबाव आले की आपल्या मनात वेगवेगळे विचार येतात. हा दबाव खूप दिवस राहिला की मनोरोग होतात.
मन:शक्ती जगातील सर्वात मोठी शक्ती आहे. ऋषीमुनींनी, शास्त्रज्ञांनी जे काही चमत्कार दाखवले ते मनशक्तीच्या जोरावरच दाखविले.
या मनाला रोखणे अवघड आहे. मनाला रोखले तर मनुष्य पागल होतो आणि मनाला जास्त मुक्त सोडले तरी ते विषय विलासात गुरफटून पागल बनते. मनाच्या नियंत्रणाचा उत्कृष्ट उपाय म्हणजे सारखे कामात व्यस्त राहणे, कर्मयोग करीत राहणे.
आपल्या मनावर आपले नियंत्रण राहिल्यास मन:स्वास्थ्य चांगले राहते व मनुष्य निरोगी राहतो.
-------------------------------------------------------------------------------