Wednesday, December 7, 2011

क्रोध Anger


क्रोध
देव, राक्षस किंवा मनुष्य कोणीही असो, सर्वजण क्रोधाचे गुलाम आहेत. आपल्याबद्धल एखादा जरी अपशब्द ऐकला तरी आपल्याला लगेच राग येतो. क्रोधामुळे विवेकाचा नाश होतो. व मनुष्य नाही ते कर्म करून बसतात. रागाच्या भरात माणूस दुस-याची निंदा, अपमान एवढेच नाही तर कुटूंबातील व्यक्ती, गुरू यांची हत्याही करू शकतो व नंतर त्याला त्या गोष्टीचा पश्चाताप होतो.
क्रोध खुप शक्तिशाली असतो. हा ज्ञान व शांती यांचा शत्रू आहे. हा माणसाला आंधळा बनवतो. क्रोध हे मानसिक दुर्बलतेचे लक्षण आहे. क्रोधाची सुरूवात मुर्खतेने होते व शेवट पश्चातापाने होतो.
क्रोध आपल्या शरीरातील उर्जेचे विकृत रूप होय. यावर नियंत्रण ठेवले तर ही उर्जा आध्यात्मिक शक्तीत रुपांतरीत होऊ शकते.
क्रोधाचे कारण-
या जगातील सर्व वाईट गोष्टींचे कारण इच्छा हे आहे. क्रोध हे इच्छेचेच दुसरे रूप आहे. माणूस भौतिक सुखाचा विचार करतो व त्याबाबतीत आसक्त होतो. आसक्तीतून इच्छा जन्माला येते. इच्छेमुळे रजोगुण उत्पन्न होतो. या रजोगुणामुळे माणूस इच्छित वस्तु मिळविण्याचा प्रयत्न करतो. ती वस्तु मिळाली तर माणूस खूप आनंदी होतो. परंतू ती नाही मिळाली तर तो क्रोधित होतो. दुधाचे जसे दही बनते तसे इच्छेतून क्रोध निर्माण होतो. क्रोधाचे मूळ कारण असते अज्ञान व अहंकार. कोणी आपला अपमान केला किंवा आपल्याला कमी लेखले की आपल्याला राग येतो. जो माणूस नेहमी आपल्या शत्रूचा विचार करतो त्यालाही लवकर राग येतो. आपण आपले विचार व आपण दिलेले सल्ले यावर खुप प्रेम करतो. आपल्याला वाटते की आपणच श्रेष्ठ. आपल्याला वाटते की दुस-यांनी नेहमी आपला सन्मान करावा. हा आपला भ्रम असतो. हा भ्रमनिरास झाल्यास आपण क्रोधित होतो. आपल्याला जरी वाटले की आपण क्रोध विसरून गेलो तरी आपल्या अंत:करणात तो लपलेला असतो.
क्रोध व न्यायोचित रोष-
माणसावर वास्तविक किंवा काल्पनिक अन्याय होणार असेल तर क्रोध निर्माण होऊ शकतो. या विपरीत सात्विक रोष हा आपल्याला एखादी गोष्ट न पटणे यातून निर्माण होऊ शकतो. यात व्यक्तीगत स्वार्थ नसतो. सात्विक रोषानंतर कधी प्रायश्चिताची आवश्यकता नसते. सात्विक रोष क्रोधापेक्षा जास्त आत्मनियंत्रित असतो. क्रोध येणे हे पाप असते पण न्यायोचित रोष हे मनुष्याचे कर्तव्यच असते. उदा. रस्त्यावर जाणा-या महिलेला छेडल्यानंतर राग येणे. यालाच धार्मिक रागही म्हणता येईल. याचप्रकारे आपल्या शिष्यांच्या चुका सुधारण्यासाठी गुरूला बाहेरून थोडा राग दाखवावा लागतो. हे वाईट नसून, शिष्यामध्ये सुधारणा होण्यासाठी गुरूला असे करावे लागते. गुरूला आतून मात्र थंड, शांत राहावे लागते. बाहेरून गरम, आतून थंड.
गुरुचा हा क्रोध त्यांच्या मनात जास्त वेळ राहत नाही, ज्याप्रमाणे समुद्रातून निघणारी लाट लगेच समुद्रात विलीन होते. असे म्हटले जाते की, एका चांगल्या मनुष्याचा क्रोध काही क्षणापर्यंतच टिकतो, मध्यम मनुष्याचा क्रोध तीन तासांपर्यंत टिकतो व एका हीन व्यक्तीचा एक दिवसपर्यंत आणि घोर पापी व्यक्तीचा राग मृत्युपर्यंत टिकतो.    
क्रोधाचे वाईट परीणाम-
राग आपल्या सुक्ष्म शरीरात असतो परंतु त्याचा प्रभाव आपल्या भौतिक शरीरावरही पडतो. राग आपला मेंदू, मज्जा संस्था व रक्त यावर वाईट परिणाम करतो. आपण रागात आल्यानंतर आपली श्वासगती वाढते, शरीर गरम होतेव आपण उत्तेजित व अधीर होतो. या रागांच्या क्षणांमध्येच शरीराचे एवढे नुकसान होते की हे नुकसान कमी करण्यासाठी अनेक आठवडे किंवा महिनेही लागू शकतात.
आधुनिक विज्ञानानुसार या रागापासुनच हृदयरोग इ. मनोशारिरीक रोग होतात. हा क्रोधाग्नी जो शत्रुसाठी सुरू झालेला असतो तो शेवटी आपल्यालाच जाळतो. क्रोध बूमरॅंग सारखे काम करतो. क्रोधाचे अस्त्र जो व्यक्ती सोडतो त्याच्याकडेच ते परत येते व नुकसान पोहोचविते. एकदा मनुष्याला राग आल्यावर त्याची विवेक बुद्धी नष्ट होते. क्रोधी मनुष्याची स्थिती एका दारूड्या माणसासारखी होते. त्याची स्मरणशक्ती नाहीशी होते, त्याची विचार करण्याची शक्ती कमी होते, त्याची बुद्धी भ्रमित होते आणि तो चांगल्या रितीने विचारही करू शकत नाही. क्रोधामुळेच सर्व वाईट गोष्टी निर्माण होतात. क्रोधामुळेच अन्याय, ईर्ष्या, अपमानजनक शब्द, क्रौर्य व हत्या, भांडणे इ. होऊ शकतात. रागाच्या भरात व्यक्ती आपली सामान्य चेतना विसरून जातो. तुम्ही जर लवकर क्रोधित होत असाल तर तुम्ही तुमचे दैनंदिन कार्य व व्यवसाय व्यवस्थित करू शकणार नाहीत व तुम्हाला आयुष्याची लढाई हारावी लागेल.
राग नियंत्रणाचे उपाय-
क्रोध हा शक्तीची अभिव्यक्ती आहे, याचा सामना करणे अवघड आहे. प्रथम आपल्याला याची तीव्रता, वारंवारता व कालावधी कमी करावा लागेल. अशा बलवान चित्तवृत्तीला कमी करण्यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करावे लागतील. चेतन मनाच्या सागरामध्ये क्रोधाची लाट येण्याची वेळच येऊ देऊ नका. अवचेतन मनातच ही लाट संपवा, जेथे ही लहान स्वरूपात असते. मनाला दुस-या दिशेला प्रवृत्त करा. त्याच्यात दिव्य विचार जागवा. खूप काळासाठी जप व कीर्तन करा. भगवद्गीता, रामायण व उपनिषदातील निवडक मंत्र व प्रार्थना यांचा जप करीत रहा.
आपल्यामध्ये धैर्य, प्रेम व क्षमा इ. क्रोधाच्या विरूद्ध भावना येऊ द्या. क्रोध हळूहळू आपोआप शांत होईल.
आपण जे खातो त्याचा स्वभावावर खूप परिणाम होतो. त्यामुळे सात्विक अन्न सेवन करा. उदा. दुध, दही, फळे, मुगदाळ, पालक, ताक इ.   
गाजर, कांदा, लसूण, फुलगोबी, मसूरदाळ, चटणी व मसाले इ. चे सेवन करू नका. धूम्रपान, मांसाहार व मद्यपान यामुळे मन चिडचिडे बनते त्यामुळे त्यांचा पूर्ण त्याग करा. चर्चा करताना किंवा बोलताना आपल्याला राग येईल असे वाटले की लगेच विषय संपवून शांत व्हा. कधी वादविवाद करू नका. नेहमी गोड व मृदू शब्द वापरा. आपले मत ठाम असू द्या परंतू शब्द मृदू व सौम्य ठेवा. शब्द कठोर असतील तर मतभेद होतील, म्हणून कमी बोला पण गोड बोला. नेहमी कोमलता, मृदूता व सौम्यता या गुणांचा विकास करण्याचा प्रयत्न करा.
विवेकाने क्रोधावर विजय मिळविता येतो. तुम्हाला कोणी कुत्रा किंवा गाढव म्हटल्यावर तुम्हाला वाईट का वाटते? दुस-याने म्हटले म्हणून तुम्ही चार पाय व एका शेपटीचे कुत्रे थोडीच बनता? ही शिवी म्हणजे काय आहे? हे तर हवेत झालेले शब्दांचे स्पंदन आहे. या रितीने विचार केल्यास राग आपोआप शांत होतो. तुम्ही सतर्क व सजग झाले तर रागाला संधीच मिळणार नाही. असे म्हणतात की, राग आला तर चेह-यावरील 40 मांसपेशी काम करतातव हसण्यासाठी फक्त 15 मांसपेशींचा उपयोग होतो. असे असेल तर रागात येऊन तुम्ही तुमची शक्ती कशाला वाया घालवता?
रागावर नियंत्रण शक्य नसेल तर ती जागा लगेच सोडून द्या. एका दूरवरच्या सहलीला जा. थंड पाणी प्या. ॐ शांति किंवा इतर मंत्राचा 108 वेळा जप करा, एक पासून 30 पर्यंत आकडे मोजा. अशा रितीने राग शांत होऊन जाईल.
आत्मसंयम व शांती-
कटूपणा, क्रूरता, हिंसा, प्रतिकार, युद्ध, विनाश या सर्व गोष्टींचे मूळ रागच आहे. रागावर नियंत्रण मिळवल्यास वाईटवृत्ती संपतात व चांगल्या गोष्टी जन्माला येतात. मनुष्याचा विवेक जागृत होतो. त्याची समज वाढते. तो योग्य अयोग्य गोष्टींमध्ये फरक समजण्याएवढा सक्षम होतो.
व्यक्तीगत स्वार्थ, लोभ, चिडचिडेपणा व राग यामुळे कोणत्याही प्राण्याला हानी पोहोचवू नका. आपसातील मतभेद्व क्रोध यांचा त्याग करा. लढाई, भांडण विसरून जा व नेहमी शांत राहण्याचा प्रयत्न करा. शांत चित्तातच ईश्वराचा प्रकाश भेटू शकतो. निरंतर प्रयत्न करून शांत होण्याचा प्रयत्न करा. शांती एक निश्चल पर्वताप्रमाणे आहे ज्याच्यावर क्रोधाच्या लहरींचा काही प्रभाव पडत नाही. प्रत्येक दिवशी शांत अशा आत्म्यावर ध्यान केंद्रीत करा. तुम्ही शांततेच्या दिव्य गुणांची प्राप्ती हळूहळू करू शकता.
वाईटाशी वाईट वागणे व चांगल्याशी चांगले वागणे सोपे आहे परंतू वाईटाच्या बदल्यात चांगले वागणे खूप कठीण आहे. वाईटाचा रस्ता सुखकर असतो परंतू चांगुलपणाचा रस्ता खूप कठीण व काट्यांनी भरलेला असतो. ज्या व्यक्तींमध्ये वाईटाशी चांगले वागण्याची शक्ती व विवेकबुद्धी असते असे व्यक्ती धन्य असतात. 
**************************हरि ॐ तत्सत्*******************************
(स्वामी सत्यानंद सरस्वती यांच्या प्रवचनाचा मराठी अनुवाद) 

No comments:

Post a Comment