Wednesday, January 12, 2011

मधुमेह,आयुर्वेद आणि योग

मधुमेह आणि आयुर्वेद
-डॉ. अनिल रामपूरकर
आज आपण आपल्या आयुष्याचा सोबती असणारा मधुमेह या आजाराविषयी काही कडू व काही गोड गोष्टी वाचणार आहोत.
वाढते शहरीकरण, आहारामध्ये जास्त कॅलरीचा वापर, शारीरिक श्रमांचे घटते प्रमाण व मानसिक ताण या गोष्टींमुळे मधुमेहाचे प्रमाण वरचेवर वाढत चालले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार-
इ.स.2000 साली जगात 135 दशलक्ष मधुमेही होते.
इ.स.2025 साली जगात 300 दशलक्ष मधुमेही असतील.
भारतात 2025 साली 57.2 दशलक्ष मधुमेही असतील असा अंदाज आहे व यात भारताचा जगात पहिला क्रमांक लागेल.
1970 मध्ये शहरी भागात 2.3 टक्के मधुमेही होते. ही संख्या वाढून 2001 मध्ये 12.1 टक्के झाली.
या आकडेवारीवरुन हे लक्षात येईल की हा मधुमेहाचा भस्मासूर वाढतच आहे.
येथे एका राक्षसाची गोष्ट आठवते.
एका राक्षसाला तो ज्याच्या डोक्यावर हात ठेवेल तो भस्म होईल असा वर मिळाला होता.
या वरामुळे उन्मत्त होउन त्याने सर्व पृथ्विला व देवांना हैराण करुन सोडले होते. सर्व देव विष्णूकडे गेले व या संकटातून सोडवण्याची प्रार्थना केली. विष्णूने सुंदर स्त्रीचे रुप घेतले. ते रुप पाहुन भस्मासुर आनंदाने नाचु लागला. नाचता नाचता त्याने स्वतःच्या डोक्यावर हात ठेवला वा तो क्षणार्धात भस्म झाला.
भस्मासुराप्रमाणेच आपणही उन्मत्त झालो आहोत, पाश्च्यात्यांचे अंधानुकरण करत आहोत. आपला इंद्रियांवर संयम राहिला नाही. आपली जीवनशैली चुकीची होत चालली आहे.
अशी ही चुकीची जीवनशैली व अनुवांशिक घटक हे मधुमेहाचे कारण ठरतात.
याशिवाय लठ्ठ्पणा, वाढते वय वा शारिरीक सुस्ती ही कारणे मधुमेह निर्माण करतात. या सर्व कारणांमुळे चयापचय बिघडतो. आपण घेतलेला आहार (कर्बोदके,स्निग्ध पदार्थ वा प्रथिने) जी शरीराचे इंधन म्हणुन काम करतात त्यांना योग्य रितीने वापरण्याची क्षमता नष्ट होते.
मधुमेहामध्ये मुख्य दोष म्हणजे शरीरात इन्सूलिनची कमतरता होणे. स्वादुपिंडामध्ये
इन्सूलिन तयार होत नाही किंवा झाले तरी नीट काम करु शकत नाही. शरीरातील साखरेचा सर्व चयापचय इन्सूलिनमार्फत चालतो.
मधुमेह लक्षणे:

-         खुप भूक लागणे पण वजन उतरणे
-         खुप तहान लागणे
-         लघवीचे प्रमाण वाढणे
-         अशक्तपणा
-         निरुत्साह
-         वरचेवर खोकला
-         जखम लवकर न भरणे
-         लैंगिक दुर्बलता
-         नागीण
-         चष्म्याचा नंबर सतत बदलणे
मधुमेहामध्ये विविध आहार पदार्थांमधील साखर शोषून घेण्याची क्रिया थांबते. म्हणजेच शरीर साखर स्विकारत नाही वा ती साखर मुत्रातून बाहेर पडते किंवा रक्तात साठते आणि अनेक रोग निर्माण होतात.
मधुमेहामुळे मेंदू, ह्रदय, पूर्ण चेतासंस्थेला आवश्यक शक्ती मिळत नाही.
-         हातापायांच्या संवेदना कमी होतात.
-         अवयवांना रक्तपूरवठा कमी होतो.
-         स्मृतीनाश होऊ शकतो.
-         पचनक्रिया मंदावते.
-         यौनसंबंधातील ताकद कमी होते.
-         हृदयाचा विस्तार होऊ शकतो.
-         मुत्राशयावरील ताण वाढून रक्तदाब वाढू शकतो.
-         डोळ्यांवरही परिणाम होऊ शकतो.

आयुर्वेद काय सांगते?
मधुमेह हा पुरातन काळापासून माहीत असलेला रोग आहे.
आयुर्वेद शास्त्राचे मुख्य ग्रंथ चरक संहिता, सुश्रुत संहिता व वाग्भट संहिता यात उल्लेख आढळतो.
चरक संहिता सूत्रस्थान (अष्टोधरीय अध्याय) मध्ये 20 प्रकारच्या प्रमेहाचे वर्णन आहे.(10 कफज, 6 पित्तज व 4 वातज).
4 वातज प्रकार- वसामेह, मज्जामेह, हस्तिमेह वा मधुमेह
यापैकी मधुमेह हा प्रकार असाध्य सांगितला आहे.
प्रकर्षेण मेहति इति प्रमेह: A
ज्या आजारात मुत्रप्रवृत्तीचे प्रमाण जास्त वाढते त्याला प्रमेह असे म्हणतात.  
किंवा मूत्रावाटे शरीरावश्यक घटक शरीराबाहेर जातात.
सामान्य कारणे-
आस्यासुखं- आरामदायी जीवन
स्वप्नसुखं- गादीवर झोपून राहणे
दधिनि- दही नियमित खाणे
ग्राम्यौदकानुपरसा:- मांसाहार
पयांसि- दूध वा दूधापासुनचे पदार्थ
नवान्नपानं- नवीन धान्याचे सेवन
गुडवैकृतंच- गुळ व साखरेपासुन तयार केलेली मिठाई
प्रमेहहेतु;कफकृच्चसर्वमA ‍‍- कफ वाढविणारे हेतु

सुश्रुत संहितेमध्ये- सदैव दिवसा झोपणे,व्यायाम न करणे, थंड, स्निग्ध, गोड, मेद वाढवणारे पदार्थ आणि अधिक द्रवपदार्थ सेवन करणा-या मनुष्याला प्रमेह होतो असे वर्णन आहे.
प्रमेह कसा होतो?
-“कफ:सपित्त पवनश्च दोषा:A
हा रोग तिन्ही दोषांमुळे विशेषत: कफ प्राधान्याने होतो.
-बहूद्रव:श्लेष्मा दोषविशेष:A
द्रव गुणाने वाढलेल्या कफदोषामुळे प्रमेह होतो.
हे दोष काय करतात?
मेद, रक्त, शुक्र, रस, मज्जा, मांस, ओज, वसा, लसिका यांना दुष्ट करतात/ बिघडवितात.
ओज, जे सर्व धातुंचे सार असते त्याचा क्षय होतो व शक्ती कमी होते.

पूर्वरुपे (रोग होण्यापूर्वीची लक्षणे):
केस जटील बनणे, तोंड गोडसर पडणे, हातापायांची आग, सुप्तता (स्पर्श कमी होणे), मुख, टाळू, कंठ नेहमी कोरडे पडणे, तहान लागणे, आळस, डोळे, नाक, कान यांच्यामध्ये जास्त मलनिर्मिती होणे, पूर्ण अंगाची आग होणे, शरीर दुर्गंधी

प्रमेह लक्षणे:
सामान्यं लक्षणं तेषां प्रभूत आविल मुत्रताA माधव निदान
अधिक मात्रेत, वारंवार वा गढूळ मुत्रप्रवृत्ती ही सामान्य लक्षणे आढळतात.

सुश्रुत संहितेनुसार प्रमेह प्रकार-2
1)      जन्मजात (मातापित्याकडून)- कृश व्यक्तींना
2)      अपथ्य सेवनाने उत्पन्न- स्थूल व्यक्तींना

अष्टांग ह्रदयामध्ये प्रमेहाचे सुंदर वर्णन आढळते-
-“शय्यासन स्वप्नसुखे रति:A
 शारिरीक थकवा येतो. उभे असेल तर बसावे वाटते. बसले तर आराम करावा वाटतो.
आराम करत झोपावे वाटते.
-         मुत्रेभिधावन्ति पिपीलिकाश्चA
लघवीला मुंग्या, मुंगळे लागतात.
प्रमेह चिकित्सासुत्र:                               
रोगी दिसायला लठ्ठ असेल वा बलवान असेल तर शोधन (लंघन, विरेचन इ.) चिकित्सा करावी.
रोगी दिसायला कृश, दुर्बल असेल तर बृंहण चिकित्सा करावी.
बलवान रोगी असेल तर स्नेहन हे पूर्वकर्म करावे व नंतर वमन, विरेचन, बस्ती इ. पंचकर्म करावेत वा त्यानंतर संतर्पण चिकित्सा करावी.
पंचकर्म चिकित्सेने शरीरशुद्धी होऊन, दोष संतुलन होऊन त्यांची द्रवता कमी होते. जाठराग्नी वाढतो. धात्वग्नी वाढतो आणि संप्राप्ती भंग होतो.
त्यानंतर रसायन चिकित्सा केल्यानेशिथिल झालेले धातु सशक्त होतात.
जे रोगी पंचकर्मयोग्य नाहीत त्यांना मंथ (सातुचे पीठ+पाणी), जव चुर्ण, पचायला हलका आहार द्यावा.
आहार- मुगदाळ, पालेभाज्या, जुन्या तांदुळाचा भात, मोहरीचे तेल
       कडू, तुरट रसाचे पदार्थ, जांभूळ, कारले
औषधे:
- दारुहळद, देवदार, त्रिफळा, नागरमोथा यांचा समान मात्रेत काढा
- आवळा रस+ हळद + मध
-  त्रिकंटकादि लेह
- फलत्रिकादी क्वाथ
- लोध्रासव, दंत्यासव, भल्लातकासव
- शिलाजित, वसंत कुसुमाकर, नवायस चुर्ण, अयस्कृती.
व्यायामादि प्रयोग:
-         विविध प्रकारचे व्यायाम
-         रगडून उटणे लावून मालिश करणे
-         स्नान (फवा-याखाली), पोहणे.
-         वाळा, दालचिनी, इलायची, अगरु, चंदन लेप
-         दिवसा न झोपणे, रात्री जागरण न करणे.
-         ज्याला औषध घ्यायचे नसेल त्याने विहीरी खणाव्यात, डोक्यावर छत्री न घेता अनवाणी पायांनी 100 योजने चालावे. गोमुत्र पीत गाईची राखण करावी असे वर्णन आहे. म्हणजेच व्यायाम, शारिरीक हालचालींना महत्व दिले गेले आहे.
-         याशिवाय सध्याच्या काळात चालणे, पोहणे, पळणे, जॉगींग, सुर्यनमस्कार, कपालभाती, प्राणायाम, ध्यान, संगीत इ. प्रकारांमुळे खुप फायदा होतो.
 आहार:
 आहाराविषयी नेहमी रुग्णांच्या मनात गोंधळ असतो. परंतु उंची, वजन, रक्तातील साखरेचे प्रमाण, रुग्णाला असलेले इतर विकार या सर्व गोष्टींचा विचार करुन डॉक्टर आहाराचा सल्ला देत असतात.
आहार सुत्रे-
1)     रोजच्या जेवणात 60 टक्के पिष्टमय पदार्थ(पोळी, भाकरी इ.), 25 टक्के प्रथिने, 15 टक्के स्निग्ध पदार्थ असावेत.
2)     सुलभ विघटन होणारे पिष्टमय पदार्थ उदा. बटाटे टाळावे.
3)     साखर, गुळ, मध, जाम, सर्व गोड पदार्थ, गोड फळे टाळावीत.
4)     पावभाजी, पिझ्झा, फास्टफूड, आईस्क्रीम, शीतपेये, दारु इ. चे सेवन करु नये.
5)     जास्त गोड व जास्त उष्मांकाची फळे उदा. आंब, केळी इ. खाऊ नयेत.
6)     तेल, सुकामेवा, शेंगदाणे खाल्ल्यास रक्तातील साखर तसेच चरबी वाढते म्हणून ते टाळावेत.
7)     जवस, मेथ्या, मोडाची कडधान्ये यात ओमेगा 3 मेदाम्ले असतात म्हणूनते वापरावेत.
8)     उपवास करु नये. कारण अन्नातील साखर ही पेशींसाठी इंधन म्हणून काम करते. अन्नामार्फत तयार झालेली जादा साखर यकृतामध्ये पाकाच्या रुपात साठविली जाते. ही साखर उपवासाच्या काळात इंधन म्हणून रक्तात येते. म्हणूनच अति उपवास केल्याने साखर कमी होण्यापेक्षा वाढू शकते व किटॉसीस सारखे गंभीर उपद्रवही होऊ शकतात.
9)     जेवणाच्या वेळा पाळणे आवश्यक
10)  भरपूर पाणी, शहाळे, ताक उत्साहवर्धक ठरतात. पण उसाचा रस, फळांचे ज्युस घेऊ नये.
11)  कृत्रिम गोडी देणारे पदार्थ (सॅकरीन गोळ्या इ.) यांचा वापर मर्यादितच व डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावा. गर्भारपण व लहान मुलांमध्ये सॅकरीन वापरु नये.
मधुमेह व हृदयरोग:
- 50 टक्केपेक्षा जास्त हृदयरोग्यांना मधुमेह असु शकतो.
- बायपास होणा-यांमध्ये 60 ते 70 टक्के व्यक्ती मधुमेही असतात.
- टाईप 2 मधुमेहातील 75 टक्के मृत्यु हृदय व रक्तवाहीन्यांच्या विकाराने होतात.
- मधुमेही स्त्रियांमध्ये हृदयविकाराचा धोका इतर स्त्रियांपेक्षा पाचपट जास्त असतो.
- हार्टफेल, शॉक, पॅरालिसीसचे प्रमाण मधुमेहीमध्ये पाचपट जास्त असते.
- कोणताही त्रास न जाणवता सायलेंट हार्ट अटॅक मधुमेहींमध्ये येऊ शकतो.
आहार नियंत्रण, साखरेबरोबरच मेदही नियंत्रणात ठेवले, नियमित व्यायाम आणि वजन आटोक्यात ठेवले तर मधुमेही आनंदी जीवन जगु शकतो.

मधुमेह व लठ्ठ्पणा-
अमेरीकेमध्ये युटी साऊथ वेस्टर्न मेडीकल सेंटर मध्ये डॉ. रॉजर लंगर यांनी 50 वर्षांपासून मधुमेह व त्या अनुषंगाने येणा-या इन्सुलिनच्या प्रतिरोधावर संशोधन केले व काही गोष्टी त्यांच्या निदर्शनास आल्या. त्या जर्नल ऑफ अमेरिकन मेडीकल असोसिएशन मध्ये प्रकाशितही झाल्या.
स्थूल व्यक्तीत सतत इन्सुलिन देण्याने त्यांच्यात स्निग्धाम्ले (fatty acids) वाढतात व ते इन्सुलिनचा उपचार निष्प्रभ करुन टाकतात.डोस वाढवून दिल्यास अजून स्निग्धाम्ले वाढतात व इन्सुलिनचा प्रभाव कमी करतात. असे दुष्टचक्र चालूच राहते.
इन्सुलिन देण्यापेक्षा आहारातून उष्मांकाचे नियंत्रण काटेकोरपणे केले तर रक्तातील अतिरिक्त इन्सुलिन कमी होते व वाढती स्निग्धाम्ल निर्मिती रोखली जाते."

सामान्य सुचना:
एक पालक मधुमेही असेल तर 40 ते 50 टक्के अपत्य मधुमेही होऊ शकतात.
दोन्ही पालक मधुमेही असतील तर 80 ते 90 टक्के अपत्य मधुमेही होऊ शकतात.
म्हणून घरात मधुमेह असल्यास 35 वर्ष वयानंतर दरवर्षी साखर तपासावी.
सतत समाधानी, आनंदी राहावे. मन नेहमी शांत असु द्यावे. पुरेशी झोप घ्यावी. ध्यानधारणेचा अभ्यास करावा.


हायपोग्लायसेमिया:
आपला आहार, व्यायाम व औषधे यांचा ताळमेळ चुकला तर साखर कमी होऊ शकते.
लक्षणे: छातीत धडधडणे, हातापायांचा थरकाप, घाम येणे, फिरल्यासारखे वाटणे, थकवा येणे, भूक लागणे, डोके दुखणे, डोळ्यापुढे अंधारी, चिडचिड होणे.
उपाय: ग्लूकोज पाणी/2-3 चमचे साखर/ खडीसाखर घेणे.
हायपोग्लायसेमिया कसा टाळाल?
वेळेवर जेवण घ्या, 3-4 वेळा थोडा थोडा आहार घ्या, प्रमाणात व्यायाम करा.
आधुनिक क्रांती:
सध्या इन्सुलिनचे पंप, इन्हेलर्स यावर संशोधन चालू आहे. बीटा पेशींची झीज रोखण्यासाठी व ती भरुन काढणारी औषधे भविष्यात बाजारात येतील.मधुमेह होण्याची शक्यता असलेल्या व्यक्तींना देखील मधुमेह न होण्यासाठी जीन थेरपीवरही संशोधन चालु आहे.
आयुर्वेद व योगशास्त्र परस्पर पूरक
आयुर्वेद व योगशास्त्र हे दोन्ही भारतीय शास्त्र असून ते परस्पर पूरक आहेत.
आयुर्वेदातील आहार, विहार, पंचकर्म, औषधी तसेच योगशास्त्रातील आसन, प्राणायाम, ध्यान या प्रक्रियांचा नियमित अभ्यास करुन मधुमेह नियंत्रणात ठेवता येतो व त्यापासून होणारे उपद्रव दूर करता येतात हे संशोधनाने सिद्ध झाले आहे.
आपल्याला भावी आयुष्यात निरामय राहण्यासाठी गोड शुभेच्छा देऊन मी येथे थांबतो.
                          हरि ॐ

No comments:

Post a Comment