Wednesday, January 12, 2011

OMKAR DHYAN

ॐ कार ध्यान
- यौगिक श्वास- 3 वेळा, ॐ कार 3 वेळा
- प्रार्थना, चक्षुविश्राम
 ॐ हे ईश्वराचे प्रतिक आहे. यालाच प्रणव असेही म्हणतात. अकार, उकार, मकार, अर्ध मात्रा व बिंदू मिळून प्रणवाची पाच अंगे आहेत. प्रणव किंवा ॐ कार हा परब्रम्हाचा, त्या अक्षरपुरुषाचा कधीही न बदलणारा वाचक शब्द मानला गेला आहे.
ध्यानबिंदुपनिषदात सांगितले आहे की, ओम म्हणजे धनुष्य व मन म्हणजे बाण आहे. या धनुष्य व बाणाच्या साहाय्याने( ॐ काराचे मानसिक ध्यान करुन) परब्रह्म या लक्ष्यापर्यंत पोचायचे आहे. ज्यांना परमतत्वापर्यंत पोहोचायचे आहे त्यांनी ॐ या ध्वनीची अर्थासहित साधना केली तर बाण थेट लक्ष्यापर्यंत पोचेल.
ॐ या प्रतिकातील अकार सृष्टीची उत्पत्ती करणा-या ब्रह्मदेवाचे प्रतिक आहे. उकार सृष्टीचे चलनवलन करणा-या (रक्षण करणा-या) विष्णुचे प्रतिक आहे. मकार हा सृष्टीचा लय घडवून आणणा-या महेशाचे किंवा शिवाचे प्रतिक आहे.
अशा अ,, म या तीन अक्षरांनी बनलेल्या ओंकाराचा मध्यमा वाणीतून केलेला उच्चार हा सर्व मणक्यांमध्ये एकाच वेळी नाद स्पंद निर्माण करतो म्हणून ओंकार जपाने ज्ञानतंतु पुष्ट होतात.
ॐ हा शक्तिशाली शब्द आहे. साधकाने एकसुराने व लयीने याचे उच्चारण केल्यास त्याची आध्यात्मिक शक्ती वाढते. याच्या उच्चारणाने स्फुर्ती वाढते व अंतर्ज्ञान मिळते.
ॐ च्या उच्चारणासोबतच त्याच्या रुपावर ध्यान केल्यास शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक लाभही मिळू शकतात.
या ॐ कार ध्यानाचा सराव पुढची दहा मिनिटे आपण करणार आहोत. आपल्याला सहज बसता येईल अशा आसनात बसा.
-         सुखासन, पद्मासन, पाठीचा कणा सरळ, हाताची ज्ञानमुद्रा
-         डोळ्यांची 20 वेळा उघडझाप
-          आता डोळे बंद करा
-          एक दिर्घ श्वास घ्या व सोडा.
-         आता आपले पूर्ण आपल्या शरीराकडे एकाग्र करा. ध्यानाच्या स्थितीकडे लक्ष द्या. पाठीचा कणा स्थिर, सरळ आहे. शरीराला आधार देण्यासाठी दोन्ही हात व पाय स्थिर आहेत. संपूर्ण शरीर ध्यानाच्या स्थितीत आहे.
-         आता आपले शरीर वृक्षाप्रमाणे असण्याची कल्पना करा. जमिनीत खोलवर रुजलेला वृक्ष. आपले धड हे त्या वृक्षाचे खोड आहे. दोन्ही पाय मुळे आहेत. ही मुळे जमिनीत खोलवर रुजलेली आहेत. हात, हाताची बोटे, डोके, मान, चेहरा हे अवयव या झाडाच्या फांद्या आहेत. असे हे वृक्षरुपी शरीर एकदम स्थिर आहे. हे वृक्षरुपी शरीर एकदम स्थिर, अचल आहे.
-         आता आपल्याला संकल्प करायचा आहे की मी या ध्यानसाधनेच्या प्रक्रियेत अजिबात हालचाल करणार नाही. मुर्तीप्रमाणे, पुतळ्याप्रमाणे, वृक्षाप्रमाणे माझे शरीर अचल, स्थिर ठेवणार आहे. एखादा डास चावत असेल, शिंक, खोकला, खाज येत असेल, अन्य काही व्याधी, हातापायात तणाव यासाठी मनाला सुचना द्या की कोणत्याही विपरीत परिस्थितीत मी हालचाल करणार नाही. हालचाल करणार नाही. आपले संपूर्ण शरीर शांत, शिथिल, स्थिर झालेले आहे.
-         आता हळुवारपणे डोळे उघडा.
-         आपल्याला समोर दिसत आहे एक खुर्ची, खुर्चीवर ठेवलेली प्रकाशझोत असलेली ॐ ची फ्रेम.
-         आपल्या दृष्टीचा संकोच करा. आता आपल्याला दिसत आहे ॐ चे प्रतीक. प्रकाशमान, दैदिप्यमान असे प्रतीक.
-         अकार- उकार- मकार- अर्धमात्रा व बिंदू या पाच अंगांनी बनलेले प्रतीक. आपली दृष्टी अकारावर द्या. हळूहळू आपली दृष्टी मकारावर न्या. नंतर अर्धमात्रेवर न्या. शेवटी आपली दृष्टी बिंदूवर स्थिर करा. प्रकाशमान, प्रदिप्त असणारा बिंदू. त्याच्यावर आपली दृष्टी केंद्रीत करा.
-         आपल्याला दिसतोय फक्त एक प्रकाशमान बिंदू. त्याच्याशिवाय आपल्याला काहीही दिसत नाही. डोळ्यांवर कुठलाही ताण येऊ देऊ नका. आपण स्वत:ला आरशात बघतो एवढ्या सहजतेने बिंदूकडे लक्ष द्या. आपली दृष्टी फक्त बिंदूवरच एकाग्र करा. आपल्याला दिसत आहे प्रणवाचे पाचवे अंग- बिंदू.
-         आता हळूहळू दृष्टीचा विस्तार करा. आपले लक्ष अर्धमात्रेकडे द्या. मकार कडे द्या, उकारकडे द्या, अकाराकडे द्या. आता आपल्याला दिसत आहे ॐ चे, प्रणवाचे पूर्ण प्रतिक. परब्रम्हाच्या, अक्षर पुरुषाच्या कधीही न बदलणा-या वाचक शब्दाचे प्रतीक.
-         आपल्या दृष्टीने हा ॐ गिरवा. अकार, उकार, मकार, अर्धमात्रा, बिंदू ही पाचही अंगे गिरवा.
-         हळूहळू अजुन आपल्या दृष्टीचा विस्तार करा.
-         आता आपल्याला दिसेल ॐ च्या प्रतिमेची (फ्रेमची) चौकट, खुर्चीवर ठेवलेली ॐ ची फ्रेम, खुर्ची, आजुबाजुचा भाग
-         आता पुन्हा आपल्या दृष्टीचा संकोच करा.
-         खुर्ची, ॐ ची फ्रेम, ॐ चे प्रतीक
-         आता ॐ च्या प्रतीकाकडे आपले ध्यान द्या.
-         डोळ्यांवर कुठलाही ताण न देता सहजरित्या ॐ च्या प्रतिकाकडे बघत राहा.
-         ॐ काराकडे सहजरितीने बघायचे आहे.
-         डोळे उघडेच ठेवून सखोल श्वास घ्या व 5 वेळा ॐ काराचे उच्चारण करा.
-         आता हळूवारपणे डोळे मिटा.
-         डोळे बंद केल्यानंतरही आपल्याला ॐ ची प्रतीमा डोळ्यासमोर दिसेल. त्या प्रतिकाकडे ध्यान द्या. ॐ च्या लहरी आपल्या मेंदुमध्ये व पूर्ण वातावरणात पसरत आहेत असा अनुभव घ्या.
-         लक्ष आपल्या दृष्टीपटलासमोर दिसणा-या ॐ कडे. ॐ दिसणे बंद झाले असेल तर जे काही आपल्या दृष्टीपटलासमोर घडत आहे त्याकडे पहा.
-         आपल्या मानसिक व शारीरिक बदलांचा अनुभव घ्या.
-         आपले पूर्ण शरीर एखाद्या वृक्षासारखे स्थिर आहे.पूर्ण लक्ष आपल्या शरीराकडे
-         दोन्ही हात एकमेकांवर घासुन डोळ्यांवर तळहाताचा हलकेच दाब द्या. ही क्रिया 3 वेळा करा. डोळे बंदच ठेवा.
-         आता बाह्य वातावरणाकडे लक्ष द्या. बाहेरच्या आवाजांकडे लक्ष द्या. हळूवारपणे डोळे उघडा.
-         येथे आपला ॐ कार ध्यानाचा अभ्यास संपतो.
हरि ॐ तत्सत् हरि ॐ तत्सत् हरि ॐ तत्सत्

No comments:

Post a Comment