Wednesday, March 6, 2013


गर्भ धारणा- एक सृजनात्मक प्रक्रिया



आजकाल प्रत्येक घरातुन ऐकायला मिळते की मुले खूपच हट्टी, चंचल बनत आहेत, कोणाचे ऐकतच नाहीत. कधी कधी ते हिंसक बनतात, तोडफोड करतात आणि मारपीट ही करतात. या मुलांच्या सैतानी वृत्तीमुळे नव्या पिढीच्या माता आपले घरचे कामही करू शकत नाहीत. बहुतांश घरांमध्ये मुले ही पालकांसाठी समस्या बनू लागली आहेत. ज्या घरांमध्ये अशी मुले नाहीत ती खरोखर भाग्यवान आहेत.
प्रत्येक आई वडीलांना वाटते की आपले बाळ निरोगी आणि हसरे असावे. परंतु या बाळाचे वय जसे वाढते तसे ते आई वडीलांना कधी जिद्द करून तर कधी सैतानी पद्धतीने परेशान करतात.
एखादी गोष्ट मागणे ठीक परंतू त्यासाठी खूपच जिद्द करणे, तोडफोड करणे किंवा काहीही बोलणे हे सर्व चुकीचे आहे. आजची मुले खुप तल्लख बुद्धीची आहेत (असे परीक्षेच्या निकालावरुन लक्षात येते) पण व्यावहारिक दृष्ट्या ते शिस्तरहीत आहेत.
आधीच्या पिढीची मुले अशी नव्हती. आजकाल एक वा दोन मुलांचा जमाना आहे. आधीचे राहणे, खाणे पिणे सरळ व साधे होते. आज मुलांना जन्म घालण्यापेक्षा त्यांचे पालनपोषण करणे आणि त्यांना शिक्षण देणे अवघड झाले आहे. आधीच्या आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये एवढा बदल का? प्रत्येक पालक हा शिकलेला आहे तरीही मुले नीतीमुल्यांपासून दूर का राहत आहेत? आपले संस्कार सध्या कमी पडत आहेत. पूर्वीच्या काळी एवढे शिक्षण नव्हते, इतकी साधने नव्हती तरीही मुले संस्कारवान आणि शीलवान बनत होती. पूर्वी मुले घरची आणि गल्लीतील ज्येष्ठ मंडळी यांचा आदर करीत होते. परंतू तो आदर आणि स्नेहभाव आता शिल्लक राहीला नाही. आपण याचा कधी विचार केला आहे का की मुले एवढी मर्यादाहीन, आचारहीन व संस्कारहीन का बनत आहेत?
याचे लोक सहजपणे उत्तर देतात की जमाना बदलला आहे. हे ठीक आहे परंतु जमाना किंवा समाज म्हणजे काय? समाज हा कुटुंबापासुन बनतो आणि कुटुंब व्यक्तीपासून बनते. आपण मुलांनाच दोष देतो परंतू आपण स्वत:च्या अंतरंगात कधी झाकून पाहीले आहे का? आपल्यात काही दोष असतील तर आपण पुढच्या पिढीपासून काय अपेक्षा ठेवावी. जसे संस्कार नवीन पिढीला मिळतील तसे ते वागतात. आपल्या मुलांना आजकाल सर्व सुविधा मिळतात ज्या आपल्याला माहीती नव्हत्या. शिक्षणाचा स्तर वाढला आहे, आपण शिक्षणावर लाखो रुपये खर्च करीत आहोत परंतू संस्कार देण्यामध्ये आपण मागे पडत आहोत. आपण भौतिक बाबींमध्ये केंद्रीत झालो आहोत आणि आतून रिकामेच आहोत. हे रिकामे असणे आजच्या पीढीला शांतता आणि प्रेम याच्यापासून वंचित ठेवत आहे. त्यांच्या भौतिक गरजा पूर्ण होत आहेत परंतू ते आतून तहानलेलेच आहेत. मग आपण आपली चूक का सुधारू नये? झालेल्या चुका पुन्हा होऊ देवू नये. जी मुले या जगात आली आहेत त्यांना आधुनिक शिक्षणासोबतच आपली संस्कृती आणि संस्कार यांचेही शिक्षण द्यावे. ते भविष्यातील आई बाप आहेत. त्यांना समजावून सांगावे की अजून पुढची पिढी कशी आदर्श बनवावी.  

गर्भाधान संस्कार-
आपल्या शास्त्राने 16 संस्कारांची एक परंपरा दिली आहे आणि त्या संस्कारांमध्ये पहिला आहे गर्भाधान संस्कार. मनोवांच्छित, चांगले अपत्य होण्यासाठी हे आवश्यक आहे. आपल्या शास्त्रामध्ये प्रतिपदा, एकादशी, चतुर्दशी, अमावस्या, पौर्णिमा, ग्रहण काळ, संधिकाळ हे गर्भाधानासाठी वर्ज्य मानले आहेत. यामुळे तिथी, वार आणि काळ यांचा समन्वय साधून गर्भधारणा करावी. आपल्याकडे या संस्कृतीसोबतच विज्ञानातील साधने आहेत. आपल्याला त्यांचाही वापर करता येतो.
गर्भधारणा संस्कारानंतर पुढे अनेक संस्कार करता येतात. त्यांची नावे अशी- पुसंवन, जात कर्म, चुडा कर्म, नामकरण, अन्न प्राशन, कर्ण छेदन, मुंडन, उपनयन, विद्याध्ययन इ. सगळे नाही तर यातील शक्य तेवढे प्रयोग जरूर करावेत.
ज्यांची मुले चांगली निघाली ते खरोखर भाग्यवान आहेत. परंतु आपण थोडी मेहनत घेतली आणि आपल्या दिनचर्येत थोडा बदल केला की भाग्यवान बनू शकतो. यासाठी प्रत्येक नवदाम्पत्यात दृढ संकल्प आणि ईच्छाशक्ती असायला हवी. काही वर्षाच्या मेहनतीनंतर आपले भविष्य नक्कीच सुखद होईल.
आपली समाज व्यवस्था पुरुष प्रधान आहे परंतू यात स्त्रीची भुमिका कमी नाही. स्त्री हीच कुटुंबाची धुरा आहे. ती गृहिणी असो की नोकरी करणारी असो कुटुंबाची तिला जबाबदारी आहेच. लहान मुले आईच्या जास्त जवळ असतात. त्यामुळे तिची जास्त जबाबदारी असते. स्त्रीचे शारीरिक, मानसिक व भावनात्मक स्तरावर स्वस्थ व संतुलित राहणे खूप आवश्यक असते. विवाहानंतर मुलगी ही पत्नी आणि सून बनते. तिला एका नवीन वातावरणात आणि नवीन लोकांसोबत राहायचे असते. तिच्या जबाबदा-या वाढतात आणि त्याचवेळी तिच्यावर आई बनण्याची जबाबदारी सुद्धा येते. यावेळी तिला आपल्या जीवन चर्येमध्ये संतुलन साधावे लागते.

गर्भावस्थेतील जीवनचर्या -
आजच्या काळात सर्व दाम्पत्य सुशिक्षित आणि समजूतदार आहेत. आपण स्वत:ला शारीरिक, मानसिक आणि आर्थिक स्वरूपात तयार करायला हवे. आपली दिनचर्या ठरवून द्यावी लागेल. काही नियमांचे पालन करावे लागेल. खाणे पिणे याकडेही लक्ष द्यावे लागेल. प्रत्येकाचे स्वप्न असते की आपल्याला होणारे अपत्य निरोगी असावे, बुद्धीवान असावे आणि गुणवानही असावे. परंतु हे स्वप्न सत्यात आणण्यासाठी आपल्यालाही पूर्वतयारी करावी लागेल. आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्ती, विशेषत: पतीचा सहभाग असणे खूप आवश्यक असते. कारण बीज जर चांगले असेल तर झाड तसेच तयार होईल आणि फळ ही तसेच मिळेल. बीजासाठी योग्य जमीन, खत, पाणी आणि उत्कृष्ट देखभालीची आवश्यकता असते. आपल्याला एखाद्या माळ्याप्रमाणे काम करावे लागेल. मुल हे आपल्या बागेतील फूल असते. म्हणून गर्भावस्थेपासून शिशु जन्मानंतर काही वर्षांपर्यंत आपल्याला पूर्ण निष्ठेने आणि जागरूक राहून मेहनत करावी लागेल. आजच्या बिघडलेल्या जमान्यात संस्कारवान बाळ जन्माला यायचे असेल तर भावी मातांना काही महत्वाच्या गोष्टींचे पालन करावे लागेल.
आपली नेहमीची दिनचर्या वेगळी असते परंतू माता बनताना आपली जबाबदारी वाढते. या काळात जर संतुलित दिनचर्या पाळली तर पुढे ती लाभदायक ठरते. आपले संस्कार जसे असतील तसे आपले बाळ बनेल. थोडी मेहनत आणि थोडा त्याग यामुळे आपल्या बाळाचे भविष्य सुधारेल. या वेळी जास्तीत जास्त प्रसन्न राहा. नेहमी चांगल्या संकल्पना मनात आणा. घृणा आणणारे आणि कुत्सित विचार मनात आणू नका. तिस-या महिन्यापासून जास्त काळजी घ्या. घरातील वातावरण शांत व प्रसन्न असावे. पतीचे सहकार्य सकारात्मक असावे. पतीला सिगारेट, दारू ई. काही व्यसन असेल तर त्याने ते सोडून द्यावे किंवा कमी करावे कारण त्याचा वास आणि धूर याचा परिणाम गर्भावर होतो. आपला आहार सात्विक असावा. जास्त मसाल्यांचा वापर टाळावा. पचायला जड अन्नपदार्थ खाऊ नये. कोशिंबीरी, ऋतुनुसार फळे आणि मोड आलेली कडधान्ये यांचा वापर जरूर करावा. जेवण्याच्या वेळामध्ये नियमितता असावी. रात्रीचे जेवण रात्री आठ वाजण्यापूर्वी करावे. टीव्ही वर भडक आणि हिंसक कार्यक्रम बघू नये. टीव्ही हे एक गोड विष आहे. याला टीबी (क्षयरोग) म्हटले तरी वावगे ठरणार नाही. शेवटी आपली संस्कृती आणि संस्कार यांचा क्षय होऊ लागला आहे.
आपण गर्भावस्थेत चांगल्या साहित्याचे वाचन करावे. चांगल्या गोष्टी ऐकाव्यात. आपल्या धर्मग्रंथांचे पठण व श्रवण करावे. महान पुरुषांची चरित्रे वाचावीत. घरात चांगले दृष्य असलेली पोस्टर्स लावावीत. प्रामाणिक आणि सज्जन व्यक्तींची संगत धरावी. प्रसन्न वातावरण असलेल्या ठिकाणीच जावे. कुठलेही आणि कोणाच्याही हातचे जेवण घेऊ नये. सकाळ- संध्याकाळ एखाद्या बागेत फिरायला जावे. तिथली फुले, पाने आणि दृश्य आपल्याला प्रसन्न करतील. शुद्ध हवाही मिळेल. सकाळी उठल्याबरोबर 11 वेळा महामृत्युंजय आणि गायत्री मंत्रांचा जप करा. आपला धर्म आणि आवडीनुसार ईश्वराचे नामस्मरण आणि त्याची आराधना करावी. याशिवाय शरीर स्वास्थ्य आणि मनाच्या संतुलनासाठी योगाभ्यासाचा सरळ कार्यक्रम ठरवावा.
खाली दिलेल्या तक्त्याद्वारे आपण मार्गदर्शन घेउ शकता. 


गर्भवती महिलांसाठी योगाभ्यास-
0 ते 3 महिने
3 ते 6 महिने
6 ते 9 महिने
आसन


पवन मुक्तासन(भाग 1,2,3)
पवनमुक्तासन (भाग 1)
पवनमुक्तासन (भाग 1)
मार्जारी आसन
मत्स्य क्रीडासन

उष्ट्रासन
वज्रासन

उत्थानासन
मार्जारी आसन

मत्स्यासन
हस्त उत्थानासन

कंधरासन
ताडासन

प्राणायाम


यौगिक श्वसन
नाडी शोधन
भ्रामरी
नाडी शोधन
भ्रामरी
उज्जायी
भ्रामरी
उज्जायी

ध्यान


योगनिद्रा
योगनिद्रा
योगनिद्रा
अजपाजप
अजपाजप

ह्रदयाकाश धारणा
ह्रदयाकाश धारणा




प्रसूती होईपर्यंतच नाही तर नंतरही आपल्याला थोडी मेहनत घ्यावी लागेल. आपल्या बालकाला काही व्यावहारिक ज्ञान द्यावे लागेल, त्याला निती मुल्यांची शिकवण द्यावी लागेल. आई आपल्या मुलाची प्रथम गुरु मानली गेली आहे आणि बाळ जन्मल्यापासुनच तिची ही भुमिका सुरु होते. खूप प्रेम, धैर्य आणि कोमलतेने आपल्या बाळाचे चांगले गुण आपल्याला वाढवायचे आहेत आणि वाईट सवयींना दूर करायचे आहे. बाळाला स्वतंत्र राहू द्या परंतू स्वच्छंदी नको. त्यांना विकसित होऊ द्या परंतू एका संतुलित पद्धतीने. ज्याप्रमाणे माळी झाडाला लहानपणापासुनच प्रेमाने वाढवतो, त्याला खतपाणी घालतो, त्याची व्यवस्थित छाटणी करतो, कीडे मुंग्यांपासून त्यांचे रक्षण करतो तसेच गरजेनुसार त्याला पाणी घालतो त्याचप्रमाणे आपले बाळ बीजरूपाने गर्भात आले आणि आता एक झाड बनून या जगात आहे. त्याच्या विकासात आपल्याला सहभाग घ्यायचा आहे. दूषित वातावरणापासून त्याला वाचवायचे आहे. त्याची देखभाल संतुलितरित्या करायची आहे. या सर्व गोष्टींची काळजी घ्यायची आहे.
आपल्या मुलाची तुलना दुस-या मुलांशी करू नका. प्रत्येकाची शारीरिक आणि मानसिक क्षमता वेगवेगळी असते. त्या क्षमतेला प्रोत्साहन द्या. त्यामध्ये असणा-या चांगल्या गुणांची स्तुती करा. ईश्वराच्या बागेमध्ये विभिन्न आकृती आणि प्रकृतीची फुले आहेत. आता आपल्या नशीबाला जे फुल आले आहे त्याला सांभाळा कारण तेही बागेची शोभाच आहे. त्याच्या क्षमता आणि गुणांना वाढवा म्हणजे त्याच्यातील दोष अथवा कमीपणा आपोआप दूर होईल. बालकाला स्वतंत्र खेळु द्या. त्याला मार लागेल किंवा कपडे खराब होतील याची काळजी करू नका. बाळ पडले तरच त्याची प्रगती होईल. राम आणि कृष्णही धुळीत खेळूनच मोठे झाले आहेत. थोडक्यात बालकांना नैसर्गिकरित्या खेळू, बागडू द्या. आधुनिक बना परंतू आपली संस्कृती नष्ट न होऊ देता. प्रयत्न करून बघा. कदाचित यामुळे आपल्या सर्वांना समाधान मिळेल.
आदर्श बालक हे आदर्श समाज आणि आदर्श राष्ट्राच्या निर्माणात निश्चितच सहाय्यक ठरेल.

(अनुवाद: योगविद्या मासिक, फेब्रुवारी 2008: स्वामी भक्तिमूर्ती)
  
         

No comments:

Post a Comment