Sunday, June 17, 2012

srinagar sight seeing


श्रीनगर दर्शन.....

मुघल गार्डन्स्, परीमहल ला भेट-

सकाळी 9 वाजता हॉटेलमधून बाहेर पडलो. आज श्रीनगरमध्ये फिरायचे होते. सुरूवातीला मुघल गार्डनचे नाव खूप ऐकले होते. चश्मेशाही गार्डन, निशात गार्डन आणि शालिमार गार्डन या तिन्हींना मिळून मुघल गार्डन्स् हे नाव आहे. सुरूवातीला आम्ही चश्मेशाही बागेत गेलो. तेथे सुंदर असे प्रवेशद्वार उंच ठिकाणी होते. त्याच्या आजूबाजूला असलेल्या झाडांना छान वेगवेगळे आकार दिले होते. प्रवेशद्वाराच्या पाठीमागे उंच हिमालयाच्या पर्वतरांगा दिसत होत्या.



आत गेल्यानंतर विविध प्रकारची फुलझाडे दिसली. विशेषत: ट्युलिप, गुलाब, झेनिया अशी मोहक फुलझाडे होती. आत गेल्यानंतर समोरच एक छान कारंजे होते. मध्ये हिरवळीवर बसून आम्ही काही फोटो काढले.
खरोखरच काश्मिर म्हणजे जणू स्वर्ग आहे असे इथे जाणवले.

आम्ही तिथून पुढे परीमहल नावाच्या बागेत गेलो. हे सहा मजली गार्डन शाहजहान चा मुलगा दारा शिकोह याने 17व्या शतकात बांधलेले आहे. प्रत्येक मजल्यावर त्याकाळच्या बांधकामांचे अवशेष आहेत. त्यामध्ये दगडाच्या केलेल्या कमानी, पाण्यासाठीचे हौद, काही खोल्यांचे अवशेष अशा विविध रचना पाहायला मिळतात.
परीमहलचे एक वैशिष्ट्य म्हणजे इथून पूर्ण दाल सरोवर आणि श्रीनगरचा बराच भाग दिसतो. इथून दिसणारे निसर्गदृश्य खरोखरच अभूतपूर्व असेच होते.
श्रीनगर हे खूप संवेदनशील असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी सुरक्षा व्यवस्था खूप कडक आहे. येथेही काही सीआरपीएफ चे जवान होते. मुलांनी त्यांच्यासोबत फोटो काढले.




इथेही बरीच मोहवणारी फुलझाडे होती.

यानंतर आम्ही निशात बागेत गेलो. प्रत्येक बागेत गेले तर नवीनच वाटत होते. निशात बाग ही दाल सरोवरच्या समोरच आहे. या बागेतूनही दाल सरोवराचे विहंगम दृश्य बघायला मिळते. निशात बागेत लांबच लांब अंतर्गत रस्ते केलेले आहेत. त्याच्या बाजूला रांगेत मोहक फुलझाडे लावलेली आहेत. त्यातली जांभळ्या रंगांच्या फुलझाडांची रांग खूपच छान वाटत होती.


शालीमार बागेत प्रवेश केल्यानंतर कारंजांची एक रांगच दिसली. कारंजातून उडणारे तुषार मन मोहवून टाकत होते. कारंजांच्या अलीकडे एक महल होता. तिथे पाणी जमा होऊन धबधब्यासारखे खाली पडत होते. ते दृश्य खूप छान दिसत होते. शालीमार बागेत असणारी विविधरंगी फुले मनाला आनंद देत होती.



शंकराचार्य मंदिर

श्रीनगरमध्ये अजून एक ठिकाण प्रसिद्ध आहे ते म्हणजे शंकराचार्य मंदिर. श्रीनगर मध्ये सर्वात उंचावर असणारे हे मंदिर भगवान शंकराचे आहे. श्रीनगरपासून 2000 फूट उंचावर असलेल्या या मंदिराच्या आजूबाजूला संरक्षित जंगल आहे. या मंदिराकडे जाताना सी आर पी एफ चे चेक पोस्ट आहेत. हा चेक पोस्ट पार केल्यानंतर आजूबाजूला घनदाट झाडी लागते. मुख्य मंदिराजवळ प्रत्येकाची कसून तपासणी केली जाते. मोबाईल, कॅमेरा या वस्तू आत नेउ देत नाहीत. त्यामुळे आम्हाला या वस्तू गाडीतच ठेवाव्या लागल्या. मंदिराजवळ गेल्यानंतर तेथे सर्वांची कसून तपासणी करण्यात आली. मंदिराला जाण्यासाठी ब-याच पाय-या आहेत. उंच उंच पाय-या चढून सर्वांनाच दम लागला. वर मंदिराच्या गाभा-यात प्रवेश करण्यासाठी कमरेचा बेल्ट काढून ठेवावा लागतो. गाभा-यात जाण्यासाठीच्या पाय-यासुद्धा खूप उंच उंच आहेत. हे मंदिर इ. स. पूर्व 200 साली बांधले गेले आहे. तेथे आम्ही महादेव पिंडीचे दर्शन घेतले. प्रदक्षिणा घालताना पूर्ण श्रीनगरचे विहंगम दृश्य इथून पहायला मिळते. दाल सरोवर, नदी, इमारती, विविध रंगी हॉटेलच्या इमारती, रिसॉर्टस्, काही ठिकाणी दाट झाडी, पलीकडे दूर डोगरांवर दिसणा-या काही इमारती सगळे दृश्य नेत्रविस्फारक होते. नंतर आम्ही शंकराचार्य समाधी स्थळाचे दर्शन घेतले. उंचावर असल्यामुळे येथील वातावरण खूप थंड होते.



दाल सरोवर-

मुलांना दाल सरोवरात जाऊन शिकाराची सफारी करण्याचे खूप आकर्षण होते. दुपारी 4 वाजता आम्ही दाल सरोवरासमोर गेलो. अथांग सागराप्रमाणे दिसणारे दाल सरोवर छान दिसत होते. दूरवर हाऊसबोट दिसत होत्या. हाऊसबोट म्हणजे सरोवरात एका ठिकाणी स्थिर असणा-या बोटी. प्रत्येक हाऊसबोटमध्ये 4 ते 6 रूम असतात. तेथे अगदी हॉटेलप्रमाणे पॉश राहण्याची व्यवस्था असते. या दाल सरोवरात काही लहान बोटी दिसत होत्या. त्यांना शिकारा असे म्हणतात. त्या छान सजवलेले असते.




दाल सरोवराचा फेरफटका मारण्यासाठी किंवा हाऊसबोट पर्यंत जाण्यासाठी या शिकाराचा वापर होतो. आम्ही दोन शिकारा किरायाने केल्या. शिकारा चालवणारे स्वभावाने चांगले होते. शिकारामध्ये बसल्यावर त्यांनी आम्हाला दाल सरोवराची माहिती देण्यास सुरूवात केली. दाल सरोवरची खोली 10 फुट आहे. हिवाळ्यामध्ये थंडीमुळे हे सरोवर पूर्ण गोठून जाते. यावर मुले फुटबॉल खेळतात. त्यावरून चालता येते हे ऐकून आम्हाला आश्चर्य वाटले. आम्ही शिकारातून फिरत असताना दुस-या शिकारातून काही दुकानदार फिरत होते. बाजूच्या एका शिकारातून एक फोटोग्राफर आला. तो शिकारा चालवून फोटोग्राफी करत असे. नंतर एक मक्याचे कणीस भाजून देणारा आला. अशा प्रकारे अनेक दुकानदार शिकारातून फिरत होते. थोड्या वेळाने पाऊस सुरू झाला. शिकारावाल्याने आम्हाला हाऊसबोटच्या जवळ नेले. पावसापासून बचावासाठी सर्व व्यवस्था केली व आमचा पुढचा प्रवास सुरू झाला. दाल सरोवराच्या बाजूला एक गाव होते. तेथील लोक सरोवरामध्ये व बाजूला शेती करतात. सरोवरामध्ये असलेल्या शेतीला फ्लोएटिंग गार्डन म्हणतात. सरोवरावर एक थर तयार करून त्यावर माती टाकून शेती केलेली असते. विशेषत: चटया विणण्यासाठी वापरणारे गवत येथे उगवले जाते. सरोवराच्या बाजूच्या शेतीमध्ये पालेभाज्या, फळभाज्या उगवल्या जातात. आम्ही गेल्यावर कांदा, कद्दू, गोबीची झाडे पाहिली. सरोवरात अनेक कमळ फुलले होते. वरून पाऊस मात्र चालूच होता. दाल सरोवरात एक तरंगते मार्केटही आहे. तेथे आम्ही काही खरेदी केली. 1.30- 2 तासाचा फेरफटका मारल्यानंतर आम्ही परत आलो.
सायंकाळी 7 वाजता जेवण करून आम्ही हॉटेलवर परत आलो.

जम्मूकडे परतताना.........
26 मे ला सकाळी 3.30 लाच उठलो. हॉटेलवाल्यांनी चहाचे सामान (इलेक्ट्रीक केट्टल, दूध पुडा, डीप चहा पावडर) आदल्या दिवशी रात्रीच देऊन ठेवले होते. 5 वाजेपर्यंत तयार होऊन आम्ही जम्मूकडे परतीच्या प्रवासाला निघालो. संध्याकाळची  ट्रेन होती. तरी जम्मू मार्गावर कधीही आणि कितीही वेळासाठी ट्रॅफिक जाम होऊ शकतो. त्यामुळे आम्ही लवकर निघालो. आम्ही निघाल्यावर खूप थंडी होती आणि पाऊसही सुरू होता. रस्त्याने येताना पामपोरा हे गाव होते. तेथे खूप केसरचे मळे पाहायला मिळाले. येतानाच्या प्रवासात पुन्हा निसर्गरम्य परिसर पाहावयास मिळाला. जवाहर बोगद्यातून येताना मजा वाटली. आजूबाजूला डोंगर, दरी, नद्या, झरे पाहून खूप आनंद वाटला. काश्मिर हे खरोखरच पृथ्वीवरील नंदनवन आहे याचा प्रत्यय आला. काश्मिरमध्ये येणारी गवताची फुले देखील एवढी सुरेख असतात की मन मोहून जाते. आम्ही जसजसे जम्मूकडे येत गेलो तसतसे वातावरण गरम होत गेले. आम्ही लवकर निघाल्यामुळे आम्हाला ट्रॅफिक जाम जास्त झाला नाही. जवाहर बोगद्याच्या रक्षणासाठी तेथे सीआरपीएफ चे खुप जवान तैनात होते. ते ठराविक अंतरावर उभे होते. आपल्या गावापासून दूर येऊन ते येथे देशाच्या रक्षणासाठी झटत होते. आम्ही त्यांना काही भेटी दिल्या. काहीजण युपीचे होते तर काही महाराष्ट्रातील. आम्ही भेटल्यामुळे त्यांना खूप छान वाटले. आम्हालाही खूप समाधान वाटले.



नंतर आम्ही एका ठिकाणी हॉटेलमध्ये थांबून थोडे खाऊन घेतले व पुढे जम्मूकडे निघालो.
आम्ही दुपारी 3 वाजता जम्मूला पोहोचलो. पाहतो तर तिथले तापमान 40 अंश. श्रीनगरला तापमान असेल 9 अंश आणि जम्मूला 40 अंश. या तापमानातल्या फरकामुळे मला ताप आला. ड्रायव्हरला अलविदा करून आम्ही स्टेशनवर थांबून आराम केला. जम्मूच्या स्थानकावर खूपच गर्दी होती.
रात्री 8.40 च्या उत्तरक्रांती एक्सप्रेसने आम्ही दिल्लीकडे परत निघालो. 



आमचा काश्मिर प्रवास खरोखर अविस्मरणीय ठरला. प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी या नंदनवनास भेट द्यायलाच हवी.
  

  

1 comment:

  1. सुंदर झालं आहे वर्णन...... आवडलं. खरोखर काश्मीर खूप अद्भुत आहे.......

    ReplyDelete