Saturday, June 1, 2013

जलपान आणि आयुर्वेद

पुढील व्याख्यान हे आकाशवाणी परभणीवर आरोग्य साधना या कार्यक्रमात प्रसारीत झालेले आहे.

हे व्याख्यान ऐकण्यासाठी खालील लिंकवर जा.
https://docs.google.com/file/d/0B7ERAbFjbxCzWWFQemNNZFhzb00/edit?usp=sharing


                                                              जलपान आणि आयुर्वेद


संस्कृतमध्ये पाण्याला जल किंवा जीवन म्हणतात. पृथ्वीच्या उदरात निर्माण आलेला जीव असा याचा अर्थ घेता येईल. पाण्याशिवाय या ग्रहावर जीवन शक्यच नाही. सा-या प्रकारचे भरण, पोषण, सृजन शक्य होते ते पाण्यामुळेच.
      आयुर्वेदामध्ये पाणी व त्याच्या उपयोगांबाबतचे संपुर्ण विवेचन दिले आहे. आकाश आणि पृथ्वी असे पाण्याचे दोन स्त्रोत आहेत. नद्या, सागर यांच्या बाष्पीभवनानंतर पडणारा पाऊस, दव, वितळणारे बर्फ आणि गारा या चार रूपांनी आकाशातुन आपल्याला पाणी मिळते. जमिनीतुन  मिळणारे पाणी नद्या, विहिरी, तलाव, झरे अशा अनेक रुपांमध्ये दिसते.  प्रत्येक प्रकारच्या पाण्यामध्ये उपचाराचे वेगवेगळे गुणधर्म आहेत.
      सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यातल्या पावसाचे [पावसाळ्यानंतरचे] पाणी शुध्द आणि आरोग्याला उत्तम असते. वर्षाच्या अन्य काळात पडणा-या पावसाच्या पाण्यात क्षार किवा अन्य अशुध्दी असण्याची शक्यता असते त्यामुळे ते शुध्द मानले जात नाही. वेगाने वाहणा-या नदीचे पाणी आरोग्याला चांगले आणि पचायला सोपे असते. सुर्य, चंद्र अथवा वा-याच्या संपर्कात न आलेले, साठवलेले तसेच अकाली आणि भर पावसाळ्यात पडणा-या पावसाचे पाणी अशुध्द मानले जाते ते पिण्यासाठी वापरु नये.
      अशुध्द पाणी उकळुन किंवा सुर्याच्या उष्णतेत तापवून शुध्द करता येते. सोने, चांदी, लोखंड किंवा स्फटिक तापवून सात वेळा पाण्यात बुडविल्यानेही पाणी शुध्द होते. उकळून अर्धे, चतुर्थांश आणि अष्टमांश केलेले पाणी पचण्यास अधिकाधिक सोपे आणि जीवनदायी होते.
      पाण्यात माती किंवा अन्य काही अशुध्दी असतील तर कमळाची मुळे, मोती, स्फटिक किंवा तुरटीच्या खडयाचा वापर करुन या अशुध्दी तळाशी स्थिर करुन, मग साध्या स्वच्छ फडक्यातुन पाणी गाळून घेता येऊ शकते.
      आपल्या शरीराला पाणी ही पचवावे लागते, थंड पाणी पचण्यासाठी सहा ते आठ तासांचा कालावधी लागतो, तर कोमट पाणी तास-दीड तासात पचते. उकळुन गार केलेले पाणी सर्वात लवकर पचते. ज्यांची रोग प्रतिकारक्षमता कमी आहे, एखादा रोग झालेला आहे अशा सर्वांनी नेहमी असेच पाणी प्यावे. जर अशा व्यक्तीला थंड पाणी प्यायचेच असेल तर त्यांनी पाणी उकळून ते मातीच्या मडक्यात भरुन ठेवावे. जेणेकरुन भांडयाभोवतालच्या खेळत्या हवेने ते नैसर्गिकरित्या थंड होईल.
      हल्लीच्या पाणी शुध्द करणा-या उपकरणांनी पाण्यातली प्रदूषके, कचरा, जीवाणू दूर होत असतील. पण, उकळल्याशिवाय पाण्यात औषधी गुणधर्म येत नाहीत. म्हणजे झटकन पचणारे, शोषले जाणारे आणि जीवनशक्ती वाढविणारे असे ते पाणी बनत नाही. चंदन, जाई-जुई, आले, मंजिष्ठा, वाळा अशा वनस्पती वापरुन तयार केलेले चूर्ण वापरून उकळवलेले पाणी पिण्यास अधिक चांगले असते. सोने आणि चांदीच्या छोटया मुद्राही पाण्यासोबत उकळलेल्या चालतात. पाणी साठवण्यासाठी आणि पिण्यासाठी सोने, चांदी, तांबे, मिश्रधातू किंवा मातीची भांडी उत्तम असतात.
            शरीराच्या विविध भागात अधिक वेगाने शोषले जावे आणि त्याच्या वहनाच्या गुणधर्मात वाढ व्हावी यासाठी पाण्यावर वनस्पतीचे संस्कार केले जातात. याचा फायदा वात, पित्त आणि कफ या दोषांच्या उपचारासाठीही होतो.  वात दोषाच्या संतुलनासाठी किंवा वात विकारामध्ये पाच ते दहा मिनिटे उकळवलेल्या दोन लिटर पाण्यात चिमूट भर चंदनाचे चूर्ण, काही पुदीन्याची पाने आणि बडीशेपेचे काही दाणे टाकावे.  पित्त दोषाच्या संतुलनासाठी किंवा पित्त विकारामध्ये पाणी अगदी कमी वेळा उकळून त्यात चार-पाच गुलाबपाकळ्या काही बडीशेपेचे दाणे आणि थोडया वाळयाच्या मुळ्या घातलेले पाणी वापरावे.
      कफ दोषाच्या संतुलनासाठी किंवा कफाच्या आजारांमध्ये पाच ते दहा मिनिटे उकळलेल्या पाण्यात तुळशीची चार-पाच पाने, ताज्या आल्याचा छोटा तुकडा आणि थोडी लवंग पूड टाकावी. कोरडी त्वचा आणि बध्द्कोष्ठतेची तक्रार असणा-या वात प्रकृतीच्या व्यक्तींनी थोडे जास्त पाणी पिलेले चांगले. सकाळी आणि संध्याकाळी घेतलेल्या ग्लासभर गरम पाण्याने शरीरातील व सांध्यातील वेदना कमी होतात आणि लठ्ठपणाही कमी होऊ शकतो. थोडक्यात गरम पाणी जठराग्नी प्रदिप्त करते, शरीरातील चिकटपणा कमी करते, वात आणि कफ कमी करते, मूत्राशयातील अशुध्दी दूर करते, तसेच खोकला आणि तापही कमी करते.
      जेवताना खूप पाणी पिणे किंवा अजिबात पाणी न पिणे, पचनाला हानीकारक असते.  ठराविक काळाने सतत थोडे थोडे पाणी पित राहणे श्रेयस्कर. भोजन सुरु करण्यापूर्वी पाणी पिण्याने जठराग्नी कमी होतो.  त्याने शक्ती घटते आणि वजन कमी होते.  जेवण झाल्यानंतर पाऊण-एक तासाने हवे तितके पाणी पिण्यास हरकत नाही. एका वैद्यकीय सुभाषितात म्ह्टलेच आहे-
अजीर्णे भेषजं वारि जीर्णे वारि बलप्रदम् ।
भोजने चामृतं वारि भोजनान्ते विषप्रदम् ॥

शेवटी सांगावेसे वाटते की आपण किती पाणी प्यायचे हे वैयक्तिक अनुभवाच्या आधारे निश्चित करावे लागते. प्रत्येकाचे वय, आजारपण, शरीरातील दोषांचे प्रमाण, ऋतू या सर्वांचा विचार करुन आपण पाण्याचा पिण्यासाठी वापर करावा. आता उन्हाळा आलेला आहेच. सध्याची दुष्काळी परिस्थिती पाहता पाण्याचा उपयोग पिण्यासाठी तसेच वापरासाठीही जपूनच करावा. 

No comments:

Post a Comment