Sunday, June 17, 2012

Journey from Katra to Srinagar


Journey from Katra to Srinagar
श्रीनगरकडे....

23 मे ला सकाळी 7 वाजता Qualis गाडीने कटराहून श्रीनगरकडे निघालो. गाडी आणि ड्रायव्हरही आम्हाला चांगला मिळाला. कटरा ते श्रीनगर हे अंतर जवळपास 263 किमी आहे. हा रस्ता पूर्ण घाटाचा आहे. त्यामुळे एका बाजूला डोंगर आणि दुस-या बाजूला दरी असा रस्ता आहे. जाणारी आणि येणारी वाहने एकाच रस्त्याने जातात. त्यामुळे ड्रायव्हरने जास्त जागरूक राहणे आवश्यक असते. आमचा ड्रायव्हर 26 वर्षाचा तरूण पंजाबी ड्रायव्हर होता. त्याचे नाव होते बंटी. तो उधमपूर जवळील एका खेड्यात राहणारा होता. घरची परिस्थिती साधारण असल्याचे तो सांगत होता. त्याच्या वागण्यावरून तो सालस व शांत वाटत होता.
कटराहून 50-60 किमी अंतर पुढे आल्यावर एक शनिमंदिर दिसले. मोठी 10 फूट उंच शनिदेवाची मूर्ती होती. तेथे थांबून आम्ही दर्शन घेतले. या प्रवासातील एक ना एक क्षण अनुभवण्यासारखा होता. प्रत्येक वेळी निसर्ग सौंदर्याचे विविध पैलू अनुभवायला मिळत होते. हिमालयाच्या पर्वतरांगा प्रत्येकवेळी आमची सोबत करत होत्या. रस्ता वळणावळणाचा असल्यामुळे थोडे पुढे गेले की मागचा वळणरस्ता दिसायचा. दुरून दिसणारा रस्ता, त्यावरून जाणारी वाहने खेळण्यातील वाहनाप्रमाणे दिसत होती.
ईश्वराने निसर्गात रंगांची उधळण कशी केली आहे बघा. अगदी वरती निळे आभाळ, त्यात असलेले कापसाप्रमाणे शूभ्र ढग, त्याखाली दिसणारे कधी राखाडी, कधी बदामी तर कधी सोनेरी रंगांचे पर्वत, त्यावर जागोजागी झाडांचे हिरवे लेणे, कधी कधी डोंगरावर दिसणारी विविधरंगी घरे, पर्वताच्या पायथ्याशी वाहणारी नदी, वाहणा-या नदीचा रंग दुधाळ तर काही ठिकाणी संथ वाहणारा निळसर प्रवाह, नदीकाठी आणि पर्वतावर येणारी विविधरंगी फुले.
 हे सर्व काही अजब होते.
रस्त्यात उधमपूर लागले. येथे आर्मीचे कमांड मुख्यालय तसेच एअर फोर्स चे कार्यालयही आहे. या कार्यालयांच्या गेटवर प्रतीक म्हणून रणगाडे ठेवले आहेत. रणगाडे आणि बंदूकधारी जवान पाहून मुलांना खूप आनंद झाला. गाडीची स्पीड कमी करून मुलांनी जवानांना सलामी दिली. त्यांनीही त्याला प्रत्युत्तर दिले. उर देशाभिमानाने भरून आले.   
सकाळी 11 वाजता आम्ही पटनीटॉप येथे पोहोचलो. येथे थंड वातावरण होते. तेथे नाग बाबाच्या मंदिरासमोर थांबलो. तेथे थांबल्याबरोबर काही दुकानदार मागे लागले. ते म्हणत होते, ’बुलबुल का बच्चा लेलो साब, बुलबुल का बच्चा|’
आम्हाला त्यांच्या बोलण्याचा काही उलगडा झाला नाही. पुढे मंदिरासमोर पादत्राणे काढताना एक लहान 8-9 वर्षाचा मुलगा समोर आला. त्याचे बोलणे त्याच्याच शब्दात- साब बुलबुल का बच्चा लेलो बुलबुल का बच्चा। आप सिर्फ देखो साब। देखने के कुछ पैसे नही लगेगे। आप देखोगे तो मुझे 10 पॉंईंट मिलेंगे। मेरे 100 पॉईंट हुए तो मुझे 300 रुपए मिलेंगे। आप देखोगे न साब। त्याचे बोलणे खूपच गोड होते. आम्ही त्याकडे दुर्लक्ष केले. पुढे दर्शन घेऊन आलो. मंदिराच्या परिसरात खूपच गार वारे सुटले होते. तेथील आजूबाजूचा परिसर खूप निसर्गरम्य होता. तेथे आम्ही फोटोही काढले.दर्शन घेऊन परतल्यावर बुलबुलचे रहस्य कळाले. बुलबुल म्हणजे काश्मिरी गालिचा. पर्यटकांनी दुकानात येऊन गालिचे बघावेत हीच त्यांची अपेक्षा.
पटनीटॉप येथे पाडोरा एंक्लेव नावाचे JKTDC चे रिसॉर्ट आहे. तेथे आम्ही गेलो. तेथे पूर्ण हिरवळ, हिरव्या रंगाची घरे, बाजूला थोडा चढाचा डोंगर, त्यावर गगनाला भिडणारी उंच उंच झाडे सर्व काही अद्भुत होते. तेथून परत येऊ नये असे वाटत होते.


अर्ध्या तासात आम्ही पटनीटॉपवरून पुढे निघालो. पुन्हा घाटाघाटाचा रस्ता सुरू झाला. हा श्रीनगरकडे जाणारा मार्ग व आजुबाजूचा परिसर एवढा मोहक आहे की क्षणाक्षणाला निसर्ग आपले रूप बदलत राहतो. एका बाजुने पाहिले तर खोल दरी, खाली कधी शांत तर कधी आवाज करत वाहणारी अवखळ नदी, नदीपलीकडे झाडी, काही घरे, थोडे वर पाहिले तर समोर पर्वतातून वाट काढत जाणारा रस्ता, त्या रस्त्यावरून दिसणारी बारीक वाहने असे दृश्य तर दुस-या बाजूला उंच उंच डोंगर, त्यावर मोठे मोठे वृक्ष तर पायथ्याशी फुलणारी रानफुले. किती सुंदर देखावा!
या मार्गावर डाळींबाची खुप झाडे आहेत. आम्ही गेलो त्यावेळी डाळींबाला खूप फुले आलेली होती. त्यामुळे ती झाडे खूपच छान दिसत होती.        
दुपारी 1.30 वाजता जेवणासाठी एका हॉटेलवर थांबलो.
तिथून पुढच्या प्रवासासाठी निघालो. या श्रीनगर मार्गावर कधीही ट्रॅफिक जाम होऊ शकतो. येथील वातावरण कधीही बिघडू शकते. कधीही डोंगरावरून दरड कोसळून रस्ता बंद होऊ शकतो. काही ठिकाणी रस्त्याचे काम चालू असेल तर किंवा जवानांसाठीचा ताफा जात असेल तरीही ट्रॅफिक जाम होऊ शकतो.
रामबल या गावाजवळ रस्त्याचे काम चालू होते. त्यामुळे ट्रॅफिक जाम होऊन वाहनांची भली मोठी रांग तेथे लागली. आमच्या ड्रायव्हरने गाडी रांगेत लावली. हा जाम किती वेळ राहील हे कुणालाच सांगता येत नव्हते. अजून कहर म्हणजे पाठीमागून येणारी काही वाहने रांगेत न थांबता पुढे जाण्याचा प्रयत्न करत होती. त्याचवेळी समोरून येणा-या वाहनांचीही रांग होती. त्यामुळे अजुनच वाहतुकीची कोंडी झाली. आमचा ड्रायव्हर अगदी सरळमार्गी होता. त्याने मात्र शेवटपर्यंत गाडी रांगेतच ठेवली. 3 तासानंतर वाहतुकीची कोंडी फुटली. हळूहळू सर्व वाहने पुढे सरकत होती. पुढे गेल्यावर कळाले की ही रांग जवळपास 2 किमी होती.
ट्रॅफिक जाममुळे आम्हाला खूप उशिर झाला होता. रात्री 7 वाजले होते. आम्ही जवाहर बोगद्याजवळ आलो. हा बोगदा 2.5 किमी लांबीचा आहे. जम्मू ते श्रीनगर हा रस्ता 12 महीने खूला रहावा यासाठी 1956 मध्ये हा बोगदा बांधल्या गेला. हा बोगदा बनिहाल आणि काझीगुंड या दोन गावांना जोडतो. यात जाण्यासाठी व येण्यासाठी असे दोन रस्ते आहेत. अचानक उजेड आणि 4-5 मिनिट अचानक अंधार यामुळे मुलांना खूप मजा वाटली. या बोगद्याच्या संरक्षणासाठी येथे बरीच फौज असते.
श्रीनगरला पोहोचायला आम्हाला 9 वाजले होते. तेथून आमचे हॉटेल शोधायला अर्धा तास लागला. श्रीनगरमध्ये प्रवेश  केल्यावर असे वाटले नाही की आपण एखाद्या राजधानीच्या शहरात गेलो आहे. तेथे सगळीकडे अंधारच होता. कुठे झकपक लाईटस् नाहीत किंवा जाहिरातीचे होर्डिंग्स् नाहीत. हॉटेलही खूप प्रकाशमान फलक लावत नाहीत. याचे कारण काही कळू शकले नाही. कदाचित अतिरेक्यांची भिती असेल. असो.
आम्ही हॉटेलसमोर पोहोचलो. तेथे हॉटेलचा मॅनेजर आला होता. तेथे मोठे गेट होते. तेथील सुरक्षा रक्षकांनी गेट उघडले. नंतर आमची गाडी आत गेली. हॉटेलचा परिसर मोठा दिसत होता. हॉटेलचे नाव होते ‘Orchade Villa Nedous’. नावाप्रमाणेच ते एक Villa होते. दूर दूर अंतरावर झोपडीप्रमाणे रूम होत्या. प्रत्येक ब्लॉक मध्ये 3 रूम्स् व एक बाथरूम होते. ते एक 4 तारांकित हॉटेल होते. व्यवस्था खूप छान होती. आम्ही फ्रेश होऊन आराम केला. कारण उद्या गुलमर्गला जायचे होते.


1 comment:

  1. सुंदर आणि सविस्तर वर्णन आहे. आवडलं. पुढे वाचतोय.

    ReplyDelete