Wednesday, June 6, 2012

Visit to Vaishnodevi


वैष्णोदेवी कडे......

त्या दिवशी रात्री आम्ही जुन्या दिल्ली स्थानकावर गेलो व तेथून जम्मु मेलने प्रवास सुरू केला. सकाळी 10 वाजता जम्मु स्थानकावर पोहोचलो. तेथे फ्रेश होऊन पुढे कटराला जाण्यासाठी बसने निघालो. खाजगी बसने कटराला जाताना महाराष्ट्राप्रमाणेच अनुभव आला. म्हणजे महाराष्ट्रात ज्याप्रमाणे खाजगी वाहने भरताना प्रवासी कोंबतात त्याप्रमाणे सुरूवातीला आलेल्यांना सीटवर, नंतर ड्रायव्हरच्या केबीनमध्ये व शेवटी गरज पडली तर जाण्यायेण्याच्या रस्त्यामध्ये कॅरेट टाकून त्यावर सीटचे कव्हर टाकून त्यावर दोघा- तिघांना बसवितात. असो. लोकांनाही adjustment ची सवयच झालेली आहे.
बसमध्ये बसल्यानंतर रस्त्यात खूप छान निसर्ग विशेषत: डोंगर, झाडी पहावयास मिळाली. रस्त्यात बस थांबल्यावर आम्ही फोटोही काढले.


कटराकडे जाताना आम्हाला घरांची संख्या खूप कमी दिसली. परंतू आर्मी, सी आर पी एफ़ च्या छावण्या जास्त दिसल्या. आणि जम्मू काश्मीर मधील सुरक्षा व्यवस्थेची कल्पना आली.
सायंकाळी 4 वाजता आम्ही कटराला पोहोचलो आणि JKTDC च्या हॉटेलमध्ये थांबलो. कटराला गेल्यावर शहरात वैष्णोदेवीला जाणा-या यात्रेकरूंची अलोट गर्दी दिसली. मी तयार होऊन यात्रा पर्ची मिळवण्यासाठी रांगेत लागलो. जवळपास दीड तासानंतर कुटुंबासाठीची पर्ची मिळाली. येथे तेथील ट्रस्टचे ढिसाळ नियोजन अनुभवायला मिळाले. कुठे काही यात्रेसंबंधी सुचना लिहीलेल्या नव्हत्या. पूर्ण रांगेसाठी एकच सुरक्षा रक्षक होता. त्यामुळे लोक रांगेत घुसत होते. एकदाची पर्ची घेऊन बाहेर पडलो. थोडेसे काही खाऊन आराम केला. रात्री फ्रेश होऊन 10 वाजता मी, पत्नी वर्षा, तेजस आणि तुषार ही दोन मुले तसेच भाचा अतूल, त्याची पत्नी व मुलगा संदीप असे सर्वजण साधारण 14 किमी च्या पायी यात्रेस निघालो. हॉटेलमधून बाहेर पडल्यावर भवनकडे (वैष्णोदेवी मुख्य मंदीर) जाणारा विद्युत दिव्यांची रांग असणारा रस्ता दिसला. डोंगराला वळसा घालणारी दिव्यांची रांग खूप छान दिसत होती आणि आपल्याला एवढ्या उंच जायचे आहे हा निश्चय आम्ही मनाशी केला.



 रात्रीची वेळ असल्यामुळे मुले झोपतील की काय ही भिती होती. परंतू सर्वांचा उत्साह दांडगा होता.
वैष्णोदेवीला वर चढताना दोन-तीन पर्याय आपल्याकडे असतात. एकतर आपण पूर्णत: पायी जाऊ शकतो. पायी चालल्यामुळे शरीर व मनाला कष्ट होतात व त्यामुळे शरीर व मनातील दोष निघून जातात आणि मनामध्ये भक्तीभाव वाढतो. दुसरा पर्याय घोडे (Ponis) करून तुम्ही जाऊ शकता. वजन जास्त असलेले व्यक्ती, हृदयविकार असलेले, श्वासाचा त्रास असलेले व्यक्ती हा पर्याय निवडू शकतात. तिसरा पर्याय पालखीचा असतो. वयस्कर व्यक्ती, आजारी व्यक्तीया पालखीतून जाऊ शकतात. या पालखीला चारजण खांद्यावर उचलतात. लहान मुलांसाठी पिठ्ठू हा एक प्रकार करता येतो. हा व्यक्ती (पिठ्ठू) मुलांना खांद्यावर घेऊन वर चढतो. परंतू त्यांची गती जास्त असते त्यामुळे त्यांच्यासोबत चालणे आपल्याला अवघड जाते. तरी लहान मुलांना घेऊन जाण्यासाठी ते खूप उपयोगी पडतात.
घोडे, पालखी आणि पिठ्ठू या तिन्ही सुविधा नोंदणीकृत आहेत त्यामुळे त्यांचे ओळखपत्र बघून व ट्रस्ट्चे दरपत्रक बघूनच यांची निवड करावी. याशिवाय हेलिकॉप्टर चा पर्यायही ट्रस्टने ठेवला आहे.     
आम्ही रात्री 10 वाजता वरती चढायला निघालो. चढ असल्यामुळे सोबत आधारासाठी काठ्या घेतल्या. सर्वजण उत्साही होते. खूप चढायचे असल्यामुळे जेवण हलकेच घेतले. गावातून जाताना बरीच दुकाने आणि वर्दळ दिसली. काही ठराविक रस्त्यापर्यंत वाहनांची, अ‍ॅटोवाल्यांची खूप गर्दी होती. पुढे संस्थानची मोठी कमान लागली. तेथे सर्व यात्रेकरूंची सुरक्षा तपासणी झाली व पुढे आम्ही पदयात्रेस निघालो. रात्र असूनही पायी चालणा-या यात्रेकरूंची संख्या खूप होती. यात्रेकरूंचा जय माता दी जोर से बोलो जय माता दी सारे बोलो जय माता दी असा जयघोष चालू होता. त्यामुळे आमचा आणि मुलांचाही उत्साह वाढला. पाठीवर सॅक बॅग घेतल्यामुळे त्यात पाण्याची बाटली, स्वेटर, टोपी, नॅपकीन व इतर आवश्यक साहीत्य बसले. जाताना ठीकठीकाणी हॉटेल्स्, पाणपोई तसेच स्वच्छतागृहांची व्यवस्था असल्यामुळे हा प्रवास सुखकर होतो. जाताना बाणगंगा येथे चेक पोस्ट आहे. तेथे तुमची दर्शन पर्ची तपासली जाते. येथे स्नानासाठी घाट आहेत. येथे माता वैष्णोदेवीने बाण मारून पाणी काढले होते व तेथे स्नान केले होते म्हणून या ठिकाणाला बाणगंगा म्हणतात. तसेच येथून घोडे, पिठ्ठू इ. किरायाने मिळतात. त्यापुढे काही ठिकाणी अरूंद व वळणाचा मार्ग आहे. अशा ठिकाणी घोडेवाले, पालखीवाले आणि पायी चालणा-यांची गर्दी होते. येथेच आम्हाला थोडा त्रास झाला व चालणे अवघड झाले. वळणावर (यु टर्न) गर्दीतून वाट काढत काठीचा आधार घेऊन वर चढणे थोडे अवघड जाते. लहान मुले सोबत असल्यामुळे आम्हाला चढताना बरेचदा बसावे लागले. रात्रीचे वातावरण तसे आल्हाददायक होते. त्यामुळे दिवसापेक्षा आम्हाला खूप कमी त्रास झाला. रस्त्यात जागोजागी अंतराचे दगड होते म्हणून आम्हाला मातेच्या दर्शनाची ओढ लागली. पहाटे 4 वाजता सर्वजण चालून चालून बरेच थकले होते. त्यामुळे आम्ही 1 तास आराम केला. 5 वाजता जाग आली तर थोडेसे उजाडले होते. उष:कालात सभोवतालचा परीसर उजळून निघत होता. उंच देवदार वृक्ष, पाईन वृक्ष डोंगरांची बरोबरी करण्याचा प्रयत्न करत होते. हळूहळू अजून उजाडले आणि हिमालयाच्या पायथ्याच्या त्रिकूट पर्वतरांगा दिसल्या. किती मोहक दृश्य होते ते!


उजाडल्यानंतरचा 3 तासाचा वेळ कसा गेला ते कळाले नाही. परंतू आता पाय ओढत नव्हते. थोड्या वेळानंतर लगेच बसावे वाटत होते. मुलांचा उत्साह मात्र आमच्यापेक्षा चांगला वाटत होता. भवन 2 किमी असा अंतराचा दगड लागला आणि भवन मधील काही इमारती दिसायला सुरूवात झाली.




संजीछ्त या ठिकाणाहून पुढे उतार सुरू होतो. त्यामुळे चालायला सोपे जाते. या वेळी आपले उद्दीष्ट जवळ येत आहे याचा आनंद झाला. जाताना ठिकठिकाणी शेड आणि बसायची व्यवस्था होती. आजुबाजूला रमणीय वातावरण होते. असे निसर्गसौंदर्य पुन्हा पाहायला मिळेल की नाही म्हणून डोळे भरून पहावेसे वाटत होते. 8 वाजत आले होते. तरीही डोंगरांनी सुर्यप्रकाशाला अडविले होते. त्यामुळे दूर पर्वतरांगांवर फक्त सुर्यप्रकाश दिसत होता. पर्वतरांगांवर सोनेरी किरणे पडल्यामुळे ती चकाकत होती व रुबाबदार दिसत होती.    
आम्ही भवन जवळ पोहोचलो. पहातो तर मातेच्या दर्शनासाठी अलोट गर्दी. आम्ही फ्रेश होऊन सामान क्लोक रूममध्ये ठेवायला 2 तास गेले. 10 वाजता दर्शनाच्या रांगेत लागण्यासाठी निघालो. दर्शनाची रांग जवळपास 2 किमी लांब होती. दर्शनाच्या रांगेचा शेवट शोधायला आम्हाला अर्धा तास लागला. मारुतीच्या शेपटीप्रमाणे ही रांग लांबतच होती. शेवटी कुठे उभे राहायचे याचा शोध लागला. हळूहळू रांग पुढे सरकत होती. रांगेमध्ये जय माता दी चा जयघोष चालू होता. त्यामुळे आमचा उत्साह वाढला. गर्दी खूप असल्यामुळे तेथील पूजा काऊंटर वरील साहित्यही संपले. 4 तासानंतर आम्ही प्रत्यक्ष मातेच्या गुफेपर्यंत पोहोचलो. अगदी गुफेच्या द्वारापाशी जाईपर्यंत आम्हाला येथे मंदिर असेल अशी कल्पना आली नाही. परंतू या मुख्य गुहेजवळ शिस्त चांगली होती. आमची सुरक्षा तपासणी झाली. प्रत्येक यात्रेकरूंकडील चामड्याच्या वस्तु, खाद्यपदार्थ काढून घेण्यात आले. तशा सुचना जागोजागी फलकावर लिहीलेल्या होत्याच. मुख्य गुहेसमोर पोहोचल्यावर हायसे वाटले. मुख्य गुहेत जयघोष करता येत नाही. तेथे शांततेत सर्व यात्रेकरूंचे दर्शन चालू होते. अखेर आम्ही प्रत्यक्ष गुहेत पोहोचलो. दर्शन खूप व्यवस्थित झाले. तेथे तीन पिंडींचे दर्शन घेतले.

"जय माता दी" तीन पिंडींचे दर्शन


 गुहेच्या बाहेर आल्यानंतर वैष्णोदेवी संस्थानतर्फे सर्व यात्रेकरूंना खडीसाखरेचा प्रसाद व पिंडी दर्शन असलेले एक चांदीचे नाणे दिले जाते. ते घेऊन आम्ही पुढे आलो. तेथे संस्थानच्या भोजनालयात अल्पदरात भोजन केले. थोडा वेळ आराम करून लगेच परतीच्या पदयात्रेला निघालो. येताना पूर्ण उतार असल्यामुळे लवकर चालता आले. येताना एका ठिकाणी तासभर आराम केला. त्या ठिकाणाहून भवनकडे जाणारे हेलिकॉप्टर्स् घिरट्या घालताना जवळून पाहायला मिळाले.

परत येताना महाराष्ट्रातील बरेच यात्रेकरू दिसले. परतीचा प्रवास दिवसा केल्यामुळे आजूबाजूचे पर्वत, द-या यांचे नेत्रसुख अनुभवायला मिळाले. रात्री जवळपास 8 वाजेपर्यंत तेथे उजेड होता. जवळ आल्यावर पुन्हा अरूंद मार्ग, घोडेवाले, पालखीवाले यामुळे चालणे अवघड झाले. रात्री 9.30 वाजता आम्ही कटराला पोहोचलो. तेथे फ्रेश होऊन जेवण केले आणि आराम केला. झोप कधी लागली ते कळालेही नाही.  

1 comment:

  1. सुंदर वर्णन आहे..... पुढील भागाच्या प्रतीक्षेत..

    ReplyDelete