Sunday, June 17, 2012

Visit to Gulmarg….


ग़ुलमर्गकडे-

सकाळी लवकर उठून आम्ही फ्रेश झालो. सकाळी 8 वाजता नास्ता रूममध्ये आला. हॉटेलवाल्यांनी सुंदर नास्ता दिला. आम्ही 9 वाजता बाहेर पडलो. गुलमर्ग श्रीनगरपासून 50 किमी आहे. जाताना आम्हाला श्रीनगरमधील मार्केट्चे दर्शन झाले. जाताना दोन्ही बाजूला सफरचंद, अक्रोडचे मळे पाहायला मिळाले. सफरचंदाचे झाड आम्ही आयुष्यात पहिल्यांदाच पाहिले. याला हिवाळ्यात फळे येतात.
रस्त्याने खूप निसर्गसौंदर्य पाहायला मिळाले. जसजसे पुढे जाऊ तसे बर्फाचे डोंगर जवळ दिसत होते.  आम्ही बर्फाच्या डोंगरावर जाणार याची सर्वांना उत्सुकता होती. जाताना रस्त्याच्या कडेला अनेक चेरी आणि स्ट्रॉबेरीची दुकाने होती. एका ठिकाणी थांबून आम्ही फोटो काढले.


पुढे गेल्यानंतर आम्हाला टॅंगमर्ग हे गाव लागले. येथे थांबल्याबरोबर आम्हाला एक गाईड भेटले. त्यांचे नाव होते अब्दुल चाचा. वय वर्ष 65. त्यांनी आम्हाला बर्फावर जाण्यासाठी कोट आणि रबरी बुट किरायाने घ्यायला लावले. ते घालून व अब्दुल चाचांना घेऊन आम्ही पुढे निघालो. गाडीमध्ये चाचांनी आम्हाला माहिती सांगायला सुरूवात केली. आजुबाजुचा परिसर, देवदारची झाडे, तेथील वातावरण याविषयी त्यांनी सविस्तर माहीती दिली. येथे कधीही वातावरण बदलू शकते आणि बर्फ पडू शकतो. आम्ही गुलमर्गच्या जवळ गेल्यानंतर आम्हाला एक धक्कादायक अनुभव आला. अब्दुल चाचा होते म्हणून आम्ही वाचलो. त्याचे झाले असे- गुलमर्ग जवळ आल्यानंतर एक डावीकडे आणि एक उजवीकडे असे दोन रस्ते फुटतात. उजवीकडे जाणारा रस्ता मुख्य ठिकाणाकडे जातो. आणि डावीकडे जाणारा रस्ता आडवळणाने डोंगराकडे जातो. तेथे आम्हाला काही जणांनी अडविले. ते म्हणत होते की आमचेच घोडे वर जाण्यासाठी करा. ते लोक दिसायला भेसूर दिसत होते. एक जण तर गाडीच्या एकदम समोर येऊन उभा राहिला व मोठाले डोळे करून आमच्याकडे बघत होता. अब्दुल चाचांनी त्याला काश्मिरी भाषेत दटावले. तरीही ते हटायला तयार नाहीत. थोडा वेळ असेच चालले. शेवटी चाचा खूप ओरडल्यानंतर ते बाजूला हटले. आम्ही पुढे गेल्यावर अब्दुलचाचा म्हणाले,’ आतंकवादी साले। आम्हाला खूप हायसे वाटले.
आम्ही गुलमर्गमध्ये प्रवेश केल्यानंतर लगेच काही घोडेवाले आमच्या मागेच लागले. एक जण तर आमच्या गाडीवर चढून पार्कींगपर्यंत आला. गाडीतून उतरल्यानंतर त्याच्याशी घासघिस करून 6 घोडे ठरवले. हे काम आम्ही अब्दूल चाचा कडे सोपवले. कारण आम्ही नवीनच असल्यामुळे आम्हाला तिथले रेटस् माहीत नव्हते.
जिथून आम्ही घोड्यांवर बसलो तो परीसर खूपच आकर्षक होता. सभोवताली दूरपर्यंत हिरवळ पसरलेली होती. दूरवर बर्फाचा डोंगर दिसत होता जिथे आम्हाला पोहोचायचे होते. वर निरभ्र आकाश होते. आधी पोपटी रंग पुढे पांढरा रंग आणि वरती निळा रंग हे रंगांचे मिश्रण अनोखे दिसत होते.
अब्दुल चाचांनी आम्हा सर्वांचे घोड्यावर बसलेले फोटो काढले आणि तेथून आमची घोडेस्वारी सुरू झाली.


सुरूवातीला थोडा वेळ सवय नसल्यामुळे त्रास झाला नंतर मजा वाटत होती. लहान मुले मात्र न घाबरता घोड्यावर बसली. आम्हाला सुचना दिल्या गेल्या. लगाम आपल्या हातात पकडून धरा. पुढे खराब रस्ता आहे. डावीकडे जायचे असेल तर लगाम डावीकडे ओढा. उजवीकडे जायचे असेल तर लगाम उजवीकडे ओढा. घोडा थांबवायचा असेल तर लगाम खेचून ठेवा. चढ असेल त्यावेळी आपला भार पुढे द्या. उतार असेल त्यावेळी मागे भार द्या. आणि खरोखरच या सुचनांचा आम्हाला खूप फायदा झाला.     
     आम्ही गेलो त्या दिवशी 2 महिन्यानंतर पहिल्यांदा सुर्य उगवला होता. आणि स्वच्छ, निरभ्र वातावरण होते. अब्दुल चाचा म्हणाले,’ तुम बहुत लकी हो, आज मौसम इतना अच्छा है। तुम कुछ अच्छा काम करते हो इसलिये आजा आपको सब देखने को मिलेगा। आणि झाले तसेच. पूर्ण दिवस स्वच्छ वातावरण होते. त्यामुळे आम्हाला पूर्ण आनंद अनुभवता आला.
पुढे गेल्यावर खिलनमर्ग अशी पाटी दिसली आणि तिथून कच्चा रस्ता सुरू झाला. या कच्च्या रस्त्याने आम्हाला चढून बर्फाच्या डोंगरापर्यंत जायचे होते. घोडे शिकलेले होते त्यामुळे त्यांना त्या रस्त्यावरील चढ उतार पूर्ण माहीत होते. जातानाचा रस्ता खूपच खराब होता. रस्त्यात मोठमोठे दगड, उंच उंच झाडे, जमिनीवर अस्ताव्यस्त पसरलेली झुडपे, मध्येच रस्त्यात असणारे झरे होते.कालच पाऊस पडल्यामुळे चिखल झाला होता आणी रस्ता निसरडा झाला होता. आमच्या 6 जणांकडे 6 घोडे होते. पण प्रत्येक घोड्याची त-हा वेगळीच होती. माझा घोडा झाडाच्या अगदी जवळून जात असे. सुरूवातीला मला समजलेच नाही. त्यामुळे मला सुरूवातीला दोनदा गुडघ्याला लागले. नंतर मात्र मी सावध झालो. मी लगाम ओढून घोड्याला झाडापासून दूर करत होतो. पण अनेकदा झाडाखालून जाताना झाडाच्या वरच्या फांद्या डोक्याला लागण्याची भिती वाटत होती. कधी पायाला झुडपे लागत होती त्यामुळे अडकवलेले पाय बाहेर निघायचे. माझ्या घोड्याचे नाव होते करण आणि वर्षाच्या (पत्नी) घोड्याचे नाव होते अर्जुन. ते एका मागोमाग एक चालायचे. झ-यावर एक घोडा पाणी प्यायला थांबला की दुसरा घोडा देखील थांबत असे. घोडा पुढे झुकला की आम्हाला मागे भार द्यावा लागायचा. मुलांचे घोडे मात्र खूप आज्ञाधारक दिसत होते. जाताना आणि येतानाही त्यांनी काहीच त्रास दिला नाही. मात्र अतुलचा घोडा एकदम टेकडीवर जाऊन उभा राहिला. आम्ही सगळे घाबरलो. कारण घोड्याला पुढे जायला रस्ताच नव्हता. पण घोडेवाल्याने पळत जाऊन त्याला धरून आणले व मार्गाला लावले.
आम्ही 2 तासानंतर वर बर्फाच्या डोंगराजवळ पोहोचलो. त्यादिवशी स्वच्छ सुर्यप्रकाश होता. त्यामुळे बर्फाचे डोंगर चांदीप्रमाणे तळपत होते. अब्दुल चाचा पुन्हा एकदा म्हणाले, तुम बहूत भाग्यवान हो की आपको इतना खूबसुरत नजारा देख रहे हो।
आम्ही घोड्यावरून उतरलो आणि बर्फावर गेलो. आम्ही प्रथमच बर्फावरून चालत होतो. रबरी बूट असल्यामुळे पाय बर्फात फसत होते व मजा येत होती. थोडे पुढे गेल्यावर अजून बर्फ वाढला. आमच्यासोबत अब्दुल चाचांनीही बर्फ खेळला.मुलांसाठी स्लेज गाडी केली. या स्लेज गाडीने मुलांना वर चढवत नेले आणि येताना त्या स्लेज गाड्यांवरून आम्ही खाली घसरत आलो. खूप मजा आली. 1 तास तेथे थांबून परत घोड्यांवर निघालो. तिथून यावेसे वाटत नव्हते. महाराष्ट्रात एवढा उन्हाळा असताना भारतातल्याच एका ठिकाणी एवढे थंड वातावरण असेल आणि बर्फ असेल हे स्वप्नवतच वाटले. भारताचे हेच वैशिष्ट आहे- विभिन्नतेतून एकता. 

परत येताना पूर्ण उतार असल्यामुळे घोड्यांवर मागे भार देऊन बसावे लागले. परत येताना थोडे अवघड वाटले. मोठमोठ्या दगडांमधून, चिखलातून, झ-यांमधून येताना भिती वाटत होती. परंतू घोडे चांगले असल्यामुळे हा प्रवास सुखकर झाला. आमच्यासोबतचे सर्व घोडेवाले आणि अब्दुलचाचा मोकळे वाटले. जाऊन परत येईपर्यंत त्यांच्या गप्पा चालू होत्या. मराठी पर्यटक तिकडे बरेच जात असल्यामुळे त्यांना चांगला’, इकडे’, तिकडे’, कसे वाटतेय असे काही शब्द पाठ होते. त्यांच्या वेगळ्या उच्चारांमुळे मजा वाटत होती. त्यांनी आम्हाला काही काश्मिरी शब्द, वाक्य शिकविले. वेळ कसा गेला ते समजले नाही.
खाली आल्यावर पुन्हा निसर्गरम्य परिसर, हिरवळ, गोल्फ कोर्स दिसले. अब्दुल चाचांचे माहिती सांगणे चालूच होते. मन या हिंदी सिनेमाचे चित्रिकरण झालेले हॉटेल दाखवले. सर्वच घोडेवाले आणि अब्दुलचाचा आमच्यात मिसळून गेले होते. आम्ही घोड्यांवरून उतरून गाडीत बसलो. अब्दुलचाचाही आमच्यासह टॅंगमर्ग पर्यंत आले. तेथे आम्ही कोटस्, बूट परत केले. 4-5 तासाच्या भेटीतच अब्दुलचाचांची आणि आमचे संबंध घनिष्ठ झाले होते. त्यांना सोडायला आम्हाला नको वाटले. आम्हाला टाटा करताना त्यांच्याही डोळ्यांतून अश्रू आले. गुलमर्गमध्ये सर्वांना अब्दुलचाचा सारखा गाईड मिळावा असे वाटते.
आजचा दिवस खूप आनंददायी आणि रोमांचक अनुभव देणारा ठरला.
आमचे ठरल्याप्रमाणे आम्ही दुस-या दिवशी जर गुलमर्गला गेलो असतो तर आम्हाला हा आनंद मिळाला नसता कारण दुस-या दिवशी तेथे पुन्हा पाऊस पडला होता. म्हणजे आमचे दैवच चांगले होते.

1 comment:

  1. अप्रतिम आणि रोमहर्षक वर्णन आहे. खूप छान लिहिलं आहे.... खरोखर काश्मीर अत्यंत सुंदर आणि थरारक आहे....... आलेले वेगळेवेगळे अनुभव छान मांडले आहेत.... फोटो अजून असतील तर छान होईल....

    ReplyDelete