Friday, June 28, 2013


भितीपासून दूर कसे राहाल?

पुढील व्याख्यान हे आकाशवाणी परभणीवर आरोग्य साधना या कार्यक्रमात प्रसारीत झालेले आहे.
हे व्याख्यान ऐकण्यासाठी खालील लिंकवर जा.



      भगवत् गीतेमध्ये दुस-या अध्यायात सांगितले आहे- प्रसन्न चेतसो हयाशु: बुध्दि: पर्यवतिष्ठते”. याचा अर्थ ज्याचे मन प्रसन्न आहे, त्याचीच बुध्दी कार्यरत असते.
एखादी व्यक्ती बुध्दिमान असून देखील मन शांत किंवा प्रसन्न नसेल तर ती बुध्दी उपयोगी पडत नाही. मनात भिती आली की वाचलेल्या गोष्टी आठवत नाहीत असा अनुभव परीक्षेला बसणा-या विद्यार्थ्यांना हमखास येतो. परीक्षा केंद्रातून बाहेर पडल्यावर मात्र सर्व मुद्दे पटापट आठवायला लागतात. तोंडी परीक्षेत इतरांना विचारलेले प्रश्न सोपे वाटतात. परंतू स्वत:वर वेळ आल्यावर तेच प्रश्न कठीण वाटतात कारण त्यावेळी आपण तणावात असतो. या ठिकाणी विद्यार्थ्यांना परीक्षेची भिती असते. अगदी लहान मुलांनाही अनोळखी व्यक्तींची भिती वाटते. त्यामुळे नवीन माणसांकडे बघितले की ती रडायला सुरु करतात. लहान मुलांपासून वृध्दांपर्यंत प्रत्येकाला कशाची तरी भिती वाटत असते.
दुस-या बाजूने पाहिले तर दैनंदिन जीवनात भय काही प्रमाणात आवश्यक आहे. भयापासून पूर्ण मुक्ती धोक्याची ठरेल. मृत्यूच्या भयापोटी माणसे प्रकृती सांभाळण्यास उद्युक्त होतात. परीक्षेत अपयशाच्या भितीने विद्यार्थी अभ्यासाला लागतात. सामाजिक नजरेतून उतरू नये म्हणून मनुष्य स्वत:ला नितीपथावर ठेवतो. पोलिसांच्या भीतीने आपण कायदे पाळतो.
परंतू अतिरेकी भिती ही आपली सर्व शक्ती खच्ची करते. स्त्रिया व मुलींना झुरळ किंवा पाल अशा निरूपद्रवी प्राण्यांची भिती वाटते. काहींना आजाराची भिती वाटते. आजाराची कल्पना देखील ते सहन करु शकत नाहीत. शाळेत शिक्षक ओरडतील तर घरी बाबा रागवतील याची भिती विद्यार्थ्यांना असते.
भितीमुळे आपली कार्यक्षमता कमी होते, एक प्रकारची मरगळ येऊ लागते. मन खिन्न होते. आयुष्यात रस वाटेनासा होतो. प्रेमभावना नाहीशी होते. एकाकी पणा जाणवू लागतो. झोप कमी होते. मनात निराशेचे साम्राज्य पसरु लागते. हा एक प्रकारचा विकारच असतो. इतर सर्व आजारांप्रमाणे भयगंड आणि मरगळ येण्यावर उपचार करावे लागतात.
प्रथम आपले शारीरिक आरोग्य सुधारले पाहिजे. त्याकरता सकस आणि संतुलित आहार घेतला पाहिजे. नियमित विविध प्रकारचे व्यायाम योग्य प्रमाणात केले पाहिजेत. सुर्यनमस्कार, कपालभाती, भस्त्रिका पाणायाम इ. योगप्रकार तसेच वीरासन, त्रिकोणासन, ताडासन, इ. उत्साह वाढविणारी आसने योग तज्ञांच्या सल्ल्याने जरुर करावीत. ध्यान, योगनिद्रा यासारखे प्रकारही मनातील भिती घालविण्यास खुप उपयोगी पडतात.
आपल्या मनाचे व्यवहार पाहण्याची सवय लावून घेतली पाहिजे. आपले विचार, आपल्या भावना, आपले अनुभव शब्दात सांगता आले पाहिजेत. आई, वडील, गुरुजन, भावंडे, मित्रमैत्रिणी यांच्या बरोबर मनमोकळेपणे बोलल्याखेरीज आपल्या मनात येणारे विचार योग्य की अयोग्य हे ठरविता येणार नाही.

अशा रुग्णांना क्वचित व्यावसायिक समुपदेशनाची गरज पडू शकते. तसे झाल्यास जरूर मानसोपचार तज्ञाची मदत घ्यावी. परंतू मनात भिती किंवा मरगळ यांना थारा देऊ नये.   

No comments:

Post a Comment