Friday, June 28, 2013

उपवास

पुढील व्याख्यान हे आकाशवाणी परभणीवर “आरोग्य साधना” या कार्यक्रमात प्रसारीत झालेले आहे.
हे व्याख्यान ऐकण्यासाठी खालील लिंकवर जा.



      भारतासारख्या मोठया देशात किंवा तसे पाहिले तर एकूणच सर्व जगात उपवासाचे महत्व समजून अधून मधून आरोग्य उपवास किंवा धार्मिक उपवास केले जातात. आषाढी एकादशी, कार्तिकी एकादशी, महाशिवरात्र, संकष्टी, पर्युषण, रोजे अशा अनेक कारणांनी अनेक लोक वेगवेगळे उपवास करीत असतात.
      काही लोक फक्त श्रावण महिन्यात मांसाहार न करणे यालाच उपवास म्हणतात. उपवास अनेक आणि त्याच्या त-हाही अनेक. परंतु उपवास हा प्रत्येकाने धरावाच व नेटाने सिध्दीस न्यावा. शरीर, मन आणि आत्मा यांच्या शुध्दीसाठी व सिध्दीसाठी उपवास ही एक महत्वाची आवश्यकता आहे. आयुर्वेद शास्त्रात उपवासालाच लंघन असे म्हटले आहे.   
      लघुभोजनं उपवासो वा लंघनम्।
म्हणजेच संपूर्ण भोजनत्याग किंवा हलके भोजन करणे याला उपवास किंवा लंघन म्हटले जाते. काहीही न खाता करायचा उपवास डॉक्टरांच्या देखरेखीखाली व त्यांच्या सल्ल्यानेच करायचा असतो. या दिवसात बाहेर जाणे वर्ज्य समजावे. या उपचारापूर्वी रक्तदाब, वजन, नाडी आणि श्वसनसंस्था इ. ची तपासणी करणे आवश्यक असते. 
      दुसरा प्रकार म्हणजे थोडेसे खाऊन उपवास करणे. एकादशी अन् दुप्पट खाशी’ असा प्रकार थोडेसे खाऊन करायच्या लंघनामध्ये चालत नाही. एरवी उपवासाच्या दिवशी खाल्ले जाणारे साबुदाना, शेंगदाणे, तळलेले पदार्थ इ. प्रकार या उपासात वर्ज्यच असतात. हे पदार्थ खाण्याचे नियम आपणच बनवले आहेत. हे पदार्थ खाल्ल्यामुळे पोट भरल्याची संवेदना होते. परंतू यामुळे लंघन व्हायचे सोडून हमखास पोट बिघडते.
      याऐवजी पचायला हलके पदार्थ घ्यायला हवेत. उपवासामध्ये उकळून अर्धे आटवलेले  कोमट पाणीच दिवसभर घ्यायचे असते व ते सुध्दा गरज लागेल तेव्हाच. साळीच्या कोरडया लाहया तुपावर परतून हळद-मीठ घालून किंवा तांदळाची पेज, मुगाचे सूप, मुग-तांदळाची खिचडी, असा या उपवासासाठीचा आहार घ्यावा. या प्रकारचा उपवास करतेवेळी सुध्दा विश्रांती घ्यावी.
      काही वेळा रोगानुसार धने, बडीशेप, सुंठ घालून केलेले पाणी दिवसभर घ्यायला आम्ही सांगतो. असे उपवास केल्यामुळे आपली ज्ञानेंद्रिये प्रसन्न होतात, अंगाला हलकेपणा येतो, तोंडाला चव येते, मल व मूत्राचे विसर्जन योग्य वेळी होते, शुध्द ढेकर येतात, आळस निघून जातो आणि असलेल्या रोगाचा जोर कमी होतो.

      आयुर्वेदाप्रमाणेच अथर्ववेदातही उपवास हा चिकित्सेचा एक प्रकार सांगितला आहे. म्हटले आहे-     
                        यत् किंचित लाघवकरं देहे तत् लंघनम्।
म्हणजे, ज्या कशाने शरीरात हलकेपणा निर्माण होतो त्याला लंघन असे म्हणतात. आयुर्वेदात ताप, उलटी, जुलाब अशा अनेक रोगांमध्ये लंघन हा पहिला आणि महत्वाचा उपचार सांगितला आहे. आयुर्वेदात उपवासाची अजून एक व्याख्या आढळते.
                        उपावृत्तस्य पापेभ्य: सहवासो गुणै: सह।
                        उपवासो स विज्ञेयो न शारीरविशोषणम्॥  
                                                      चरक-चक्रपाणी टीका.  

पापकर्मातून निवृत्त होऊन परमेश्वरापाशी चित्त एकाग्र करणे याला उपवास म्हणतात. उपवास म्हणजे शरीर शोषण करणे नव्हे.
      कडक उपवास एखाद्या प्रकृतीला चालू शकतो. हलका व कमी आहार घेणे हे मात्र सर्वांनाच आरोग्यदायी ठरते. म्हणजे उपवास हा प्रकृतीनुसार करावा. आयुर्वेद शास्त्रात उपवास करण्यास योग्य कोण आणि अयोग्य कोण यांची यादीच दिली आहे. उदा. ज्यांना मधुमेह, त्वचारोग, स्थौल्य, डोळ्यांचे आजार, शिरोरोग आहेत त्यांनी लंघन करावे. मिठाई किंवा तेलकट पदार्थांचे अतिरिक्त सेवन करणा-यांनी ताप आला असता लंघन करावे. शरीरात आमदोष अथवा अपचनामुळे विषद्रव्यांचा संचय होत असल्यास लंघन करावे.

      कफ व पित्तप्रधान अवस्थेमध्ये लंघन करावे. या विपरीत लंघन कोणी करू नये हेही सांगितले आहे. वाताधिक्य असल्यास, वातरोग, क्षयरोग झाला असल्यास, लहान मुले, वृध्द, दुर्बल व्यक्ती यांनीही उपवास करू नये. उपवासास योग्य व्यक्तींनीही आपली शरीर प्रकृती सांभाळून प्रमाणात उपवास करावा. लंघन/उपवास हा आरोग्य प्राप्तीसाठीच करायचा असल्याने त्याचा अतिरेक होऊ नये.  

No comments:

Post a Comment