Thursday, June 6, 2013

कोलेस्टेरॉल अर्थात रक्तातील चरबी

पुढील व्याख्यान हे आकाशवाणी परभणीवर आरोग्य साधना या कार्यक्रमात प्रसारीत झालेले आहे.
हे व्याख्यान ऐकण्यासाठी खालील लिंकवर जा.

कोलेस्टेरॉल अर्थात रक्तातील चरबी
      कोलेस्टेरॉल बध्दल आपल्याला थोडीफार माहिती असते. कोलेस्टेरॉल आणि हृदयविकाराचा काहीतरी संबंध आहे हे आपण ऐकलेले आणि वाचलेले असते. कोलेस्टेरॉल हा काहीतरी अपायकारक पदार्थ असावा असे कुठेतरी मनात राहून गेलेले असते.  
      कशाचाही अतिरेक वाईट असतो त्याचप्रमाणे रक्तातील कोलेस्टेरॉल वाढणे वाईटच असते. परंतू काही प्रमाणात कोलेस्टेरॉल केवळ उपयोगीच नव्हे तर आवश्यकही असतो, याची जाणीव ठेवणे आवश्यक असते.
      आपल्या यकृताच्या पेशी रक्तातील कोलेस्टेरॉलचे रुपांतर कोलिक अ‍ॅसिड या रेणूत करतात. या कोलिक अ‍ॅसिडचे रुपांतर पित्तरसातील बाईलसॉल्टसमध्ये होते. बाईलसॉल्टस पचनक्रियेत आणि मेदघटकांच्या शोषणात फार महत्वाचे कार्य करतात.
      कोलेस्टेरॉलचे इतर कार्यही महत्वाचे असते. कॉर्टिसॉल आणि इतर अ‍ॅड्रीनोकॉर्टिकल हॉर्मोन्सची निर्मिती, प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजेन या स्त्रीबीजांडकोशातून स्त्रवणा-या हार्मोन्सची बांधणी, पुरुषत्वाला जबाबदार असणा-या टेस्टोस्टेरॉन या हार्मोनची निर्मिती कोलेस्टेरॉलच्या रेणूपासूनच होते.
      आपल्या त्वचेच्या कॉर्नियम नावाच्या स्तरात कोलेस्टेरॉल साठवून ठेवले जाते. त्वचेत बाहेरुन येणा-या पदार्थांना रोखण्याचे आणि शरीरातील पाणी उडून जाऊ नये यासाठी या स्तराचे महत्व असते.
      कोलेस्टेरॉल रक्तात येते त्याचा फारच थोडा भाग आहारातील कोलेस्टेरॉल मधून येतो. अशा कोलेस्टेरॉलचे प्रमाण जसजसे वाढते, तसतसे रक्तातील लो-डेंसिटी लायपोप्रोटिन्सचे (LDL) प्रमाण वाढू शकते. आहारातील कोलेस्टेरॉल मटण, अंडी, दूध इ. प्राणिजन्य पदार्थातून येणे शक्य असते.
      रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढण्याचे प्रमुख कारण आहारातील सॅच्युरेटेड फॅटस् हे होय. आहारातील मटण, तूप, लोणी, वनस्पती तूप, केक्स्, बिस्कीटे, चीज, आईस्क्रीम, खोबरेल तेल, पाम ऑईल अशा सॅच्युरेटेड फॅटस् मधून मिळते.
      सॅच्युरेटेड फॅटस बरोबरच ट्रान्स फॅटी अ‍ॅसिडस् म्हणजे फास्ट फूडस् नावाखाली येणारे पिझा, पोटॅटो चिप्स्, वेफर्स, केक, बिस्कीटे आणि पुनः पुन्हा उकळ्लेले तेल यामधून मिळतात. या सॅच्युरेटेड फॅटस् आणि ट्रान्स फॅटी अ‍ॅसिडस् मुळे एच.डी.एल.’(H.D.L.) कमी होतो. हृदयविकार होण्याचे हे सर्वात प्रमुख कारण गणले जाते.
      म्हणजेच आहारातील कोलेस्टेरॉलपेक्षा सॅच्युरेटेड फॅटस् आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ट्रान्स फॅटी अ‍ॅसिडस् यांचे सेवन कमी करणे महत्वाचे आहे. विशेषतः सर्व रंगीत भाज्यात व रंगीत फळात असणारे बीटाकॅरोटिन देखील उपयुक्त असते. त्याकरिता लाल भोपळा, माठ, गाजर, कोथिंबिर, मिरची यांचा आहारात समावेश करावा.
      आहारात जोडीला आंबा, चिकू, संत्री, पपई, टरबूज अशी फळे अवश्य खावीत. सामिष आहार घेणा-यांनी मासळी खावी. आहाराइतकेच कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करण्यासाठी पायी फिरणे, जॉगिंग, सुर्यनमस्कार इ. व्यायाम प्रकार करणे आवश्यक असते. तसेच धुम्रपान आणि मद्यपान कटाक्षाने वर्ज्य करणे आवश्यक असते. मद्यपानामुळे ट्रायग्लिसराईडस् चे प्रमाण वाढते.
      आपल्या रक्तातील कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसराईडस्, एल.डी.एल आणि व्ही.एल.डी.एल अशा चरबीच्या घटकांचे प्रमाण वाढल्यावर रक्तवाहिन्यांमध्ये अ‍ॅथेरोस्क्लेरोसिस होऊन रक्तवाहिन्यांना आतून प्लाकस् किंवा चरबीचे थर चढू लागतात आणि रक्तप्रवाहात अडथळा येऊ लागतो. त्यामुळे इस्केमिक हार्ट डिसीज उदा. करोनरी ब्लॉक्स, अंजायना, मायोकार्डियल इन्फाकर्शन असे गंभीर हृदयरोग होतात.
      अशा वेळेस इतर औषधोपचारांबरोबरच कोलेस्टेरॉल कमी करण्याकरता आधुनिक वैद्यकशास्त्रातील काही औषधे वापरली जातात. परंतू काही रुग्णांची भूक मंदावणे, अपचन, गॅसेस, स्नायूंना अपाय झाल्यामुळे अंग दुखणे आणि यकृताचे कार्य बिघडणे असे विविध दुष्परिणाम त्यामुळे घडू शकतात. याशिवाय ही सर्व औषधे सतत वापरण्याकरिता बरीच महाग असतात.

      आयुर्वेद शास्त्रानुसार शरीरातील सात धातूंपैकी चौथा धातू म्हणजे मेद. मेदाचा संबंध शरीरातील चरबी अथवा फॅटस् यांच्याशी लावता येईल. प्रमाणाबाहेर वाढ झालेल्या मेदाला कमी करण्यासाठी काही वनस्पती वापरल्या जातात. त्या मेदाचे लेखन करतात. आयुर्वेद तज्ञांचा सल्ला घेऊन या औषधींचा वापर जरुर करावा.

No comments:

Post a Comment