Wednesday, June 5, 2013

डॉक्टर आणि रुग्ण सुसंवाद

पुढील व्याख्यान हे आकाशवाणी परभणीवर आरोग्य साधना या कार्यक्रमात प्रसारीत झालेले आहे.
हे व्याख्यान ऐकण्यासाठी खालील लिंकवर जा.
https://docs.google.com/file/d/0B7ERAbFjbxCza1dzTHc1T3NuSnM/edit?usp=sharing

डॉक्टर आणि रुग्ण सुसंवाद

जो समाज कलाकारांच्या कलेचे महत्व जाणतो, श्रेष्ठ साहित्यिकांचे अक्षर वाड़मय, संत महंतांचे बोल, राष्ट्रासाठी प्राण अर्पण करणारे देशभक्त यांचे महत्व जाणतो त्या समाजाची सामाजिक प्रकृती चांगली आहे, असे म्हणता येईल.
हा नियम प्रत्येक व्यवसायाला लागू होतो. वैद्यकीय व्यवसायही याला अपवाद नसतो. एका बाजुने वैद्यकीय व्यवसायिक आणि दुस-या बाजूने रुग्ण यांत काही देवाणघेवाण चालू असते. या देवाणघेवाणीत दोन्ही बाजूंनी समाधानी असणे हे समाजाच्या आरोग्याच्या दृष्टीतून आवश्यक असते.
वैद्यकीय व्यवसायिक हे या सामाजिक रचनेची एक बाजु असतात. डॉक्टर्स, वैद्य, होमिओपॅथस्, फिजिओथेरपीस्ट, अ‍ॅक्युप्रेशरिस्ट, योग शिक्षक, निसर्गोपचार तज्ञ असे अनेक शास्त्रांचे अभ्यासक या बाजुचा गाभा बनतात.
औषध विक्रेते, परिचारिका, स्वागतकक्षातील सहाय्यिका, रुग्णालय कर्मचारी, औषधे तयार करणा-या कंपन्या इ. देखील याच बाजुला आपापले स्थान सांभाळत असतात. प्रत्येकाने आपापले काम प्रामाणिकपणे करावे अशी समाजाची रास्त अपेक्षा असते. आपण देत असलेल्या सेवेचा योग्य मोबदला मिळावा अशी या घटकांतील व्यक्तींची अपेक्षा असते. हा मोबदला डॉक्टरांची फी, सेवकांचे पगार, औषधांच्या आणि वस्तूंच्या किंमती अशाप्रकारे प्राय: आर्थिक स्वरुपाचा असतो. त्याचबरोबर रुग्णाने आपला सल्ला मानावा अशीही अपेक्षा असते.
कळत नकळत आपल्या सेवेच्या मोबदल्यात रुग्णाने आपल्याला मान द्यावा, समाजाने आपले कौतूक करावे ही देखील महत्वाची अपेक्षा असते. रुग्ण, त्याचे नातेवाईक, मित्रमंडळी, समाजाचे भले चिंतणारे समाजसेवक, हे या देवाणघेवाणीची दुसरी बाजू असतात.
आपली तक्रार दुर व्हावी, आजार जावा, आपल्या माणसाला बरे वाटावे, ही मूळ अपेक्षा असते. डॉक्टरांना उत्कृष्ट ज्ञान असावे. डॉक्टरांकडे सहानुभूती असावी, कणव असावी, आपल्या शारीरिक त्रासाबरोबरच मानसिक, आर्थिक, कौंटुबिक, सांस्कृतिक गरजांचीही दखल घेतली जावी अशीही अपेक्षा असते. या दोन्ही बाजूंच्या अपेक्षा रास्तच आहेत. यशस्वी व्यवसाय म्हणजे दोन्ही बाजूंच्या गरजा पूर्ण होणे. या दोन्ही बाजूंच्या अपेक्षा वास्तव असाव्यात समाजातील बहुसंख्य विचारवंतांना मान्य असाव्यात तरच रुग्ण आणि डॉक्टरांमध्ये सुसंवाद घडेल.
वैद्यकीय सुसंवादामध्ये रुग्णाच्या बाजुने महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला होणारे त्रास जावेत ही रुग्णाची अपेक्षा पूर्ण होणे.  डॉक्टरांनी आपले म्हणणे नीट ऐकून घ्यावे, समजून घ्यावे, स्वाभाविकपणे तेवढा वेळ डॉक्टरांनी आपल्याला द्यावा अशी अपेक्षा असते. मला लगेच पाहावे. माझ्यासाठी भरपूर वेळ द्यावा. माझ्या सोयीच्या वेळा आणि सोयीच्या जागी डॉक्टरांनी त्यांचा वेळ काढावा असे वाटणे स्वाभाविक आहे.
व्यवसाय म्हटला की अनेक रुग्णांची गरज पाहावी लागणार, सगळ्यांचे त्याच वेळी, त्यांच्या घरी लगेच पाहण्याची अपेक्षा वाजवी कशी असू शकेल? त्यापेक्षा ज्यांना शक्य असेल त्यांनी आपापल्या डॉक्टरांच्या सोयीच्या जागी वेळ ठरवून त्यांचा सल्ला घेतला, तर ही देवाणघेवाण सुकर होईल.
अर्थातच तीव्र दुखणी आणि अत्यवस्थ अवस्थेत हे नियम मोडावे लागतात अशा रुग्णांना केव्हाही पाहावे लागते. त्यामुळे वेळ जरी ठरविली, तरी ती काटेकोरपणे पाळणे डॉक्टरांना शक्य नसते, याचेही भान रुग्णांना ठेवणे आवश्यक असते.
आपल्याला होणारे त्रास जावेत या हेतूने रुग्ण डॉक्टरांकडे येतात, हे जरी खरे असले तरी आपल्याला नेमका त्रास जाणवतो आहे हे अनेकदा स्पष्ट समजेल अशा शब्दात ते सांगत नाहीत. रुग्णाला नेमका त्रास काय होत आहे हे डॉक्टरला सोप्या शब्दात, निर्भेळपणे सांगणे हा महत्वाचा भाग आहे. यामुळे डॉक्टरांना नक्की निदान करता येते.
जेव्हा एखादा रुग्ण मला चक्कर येते म्हणतो, तेव्हा या तक्रारीचा नेमका अर्थ काय, समजत नाही, चक्कर येणे म्हणजे चालताना तोल जातो का? बसल्या बसल्या आपल्या भोवतालच्या वस्तु फिरत आहेत, अशी भावना होते का? स्वतः फिरत आहोत, असे जाणवते का? झोपताना किंवा झोपून उठताना गर्रकन फिरते का? डोळ्यांसमोर अंधारी येते का? क्षणमात्र बेशुध्द होता का? असे अनेक प्रश्न विचारुन चक्कर येणे म्हणजे नेमके काय होते हे विचारावे लागते.
बाहेरच्या वस्तु किंवा आपण स्वतः फिरणे, अशी भावना पाच-सात सेकंदांसाठी राहणे हे लक्षण कानांच्या आतल्या भागातील लॅबरींथ या भागात किंवा या भागाचे आणि मेंदूचे संबंध यात काही बिघाड झाल्याचे लक्षण असते.
क्षणमात्र डोळ्यासमोर अंधारी येणा-या व्यक्तीच्या मेंदूच्या रक्तपुरवठयात व्यत्यय तर येत नाही ना अशी शक्यता असते. भान हरपणे, बेशुध्द होणे ही लक्षणे निश्चित मेंदूचे विकार दर्शवितात.

आपल्याला काय विकार झाला आहे याचा अंदाज तक्रार म्हणून रुग्ण सांगतात. उदा. पोट दुखणे ही खरी तक्रार आहे. पण मला पित्त झाले आहे, मला अ‍ॅसिडीटी झाली आहे, मला गॅसेस झाले आहेत किंवा कॉस्टिपेशन झाले आहे या सा-या प्रत्यक्ष होणा-या भावना नसून आपल्याला त्रास कशाने झाला आहे, याचा एक अंदाज रुग्णाने व्यक्त केलेला असतो. त्याकरिता रुग्णाने डॉक्टरांना काय त्रास होत आहे हे स्पष्टपणे सांगायला हवे. आपला अंदाज व्यक्त करु नये. 

No comments:

Post a Comment