Tuesday, June 5, 2012

Akshardham Delhi and Science centre Visit


दिल्ली येथील अक्षरधाम व विज्ञान केंद्राला भेट

18 मे ला परभणीहून सचखंड एक्स्प्रेसने निघालो. 19 मे ला दुपारी बरोबर 12.30 वाजता हजरत निजामुद्दीन स्थानकावर पोहोचलो. तेथे दादा आम्हाला घ्यायला आला होताच. त्याच्या कारने नोएडाला घरी गेलो. स्नान वगैरे आटोपून सायंकाळी अक्षरधाम मंदिरासाठी निघालो. तिथून नोएडा सिटी सेंटर या मेट्रो रेल्वे स्थानकावर गेलो. मेट्रोने अक्षरधाम स्थानकापर्यंत जायचे होते.



मेट्रो स्थानकात प्रवेश केल्यावर असे वाटले की आपण परदेशातच आहोत. तेथे प्लॅटफॉर्म वर जाण्यासाठी यांत्रिक पाय-या (Elevator) ची सोय होती. वर गेल्यावर समजले की दर दोन मिनिटांनी एक ट्रेन येते. ट्रेन येण्यापूर्वी लोक रांगेत उभे राहतात. ट्रेन आल्यावर आपोआप तिचे दरवाजे उघडतात. आतमध्ये गेल्यावर पुन्हा थोड्या वेळाने दरवाजे आपोआप बंद होतात. आतमध्ये पूर्ण वातानुकूलित डब्बे. त्यामुळे लांब प्रवास केला तरी थकवा येत नाही. आतमध्ये मेट्रो मार्गाचा नकाशा लावलेला. तसेच स्पीकरफोनवर सतत सुचना चालू असतात.
अगला स्टेशन अक्षरधाम है। कृपया दरवाजों से हटकर खडे रहे। दरवाजें बायी तरफ खुलेंगे।“  इत्यादी. त्याचबरोबर हिंदी व इंग्रजीतून Display ही चालू असतात. प्रत्येक स्थानकावर तिकीट काढल्यावर एक टोकन मिळते. ते टोकन मशीनवर लावल्याशिवाय स्थानकात प्रवेश मिळत नाही. आणि प्रवास संपल्यावर ते टोकन मशीन मध्ये टाकल्याशिवाय स्थानकाच्या बाहेर पडता येत नाही. या सर्व अचूक नियोजनाबद्धल मेट्रो मॅन ई- श्रीधरन व त्यांच्या चमूचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. असो. हे झाले मेट्रो पुराण.
आम्ही 6.20 ला अक्षरधाम स्थानकावर पोहोचलो. 6.30 वाजता अक्षरधाम मंदिराचा प्रवेश बंद होतो म्हणून धावतपळत सायकल रिक्षा करून तिथे पोहोचलो. एकदा पोहोचल्यावर मात्र रात्री 11 वाजेपर्यंत तुम्ही आत फिरू शकता. आज शनिवार- सुटीचा दिवस असल्यामुळे तिथे खूप गर्दी. मोबाईल, कॅमेरा काऊंटर वर जमा करण्यात अर्धा तास गेला व नंतर कडक सुरक्षा तपासणी होऊन आत प्रवेश मिळाला.



अहाहा! आत गेल्यावर भव्य असे अक्षरधाम मंदीर व त्याच्या आजूबाजूला अनेक सुरेख वास्तूशिल्प दिसले. प्रवेश द्वाराजवळ अक्षरधाम स्वामिनारायण मंदिराबद्दल माहीतीपर अनेक भित्तीपत्रके होती. आत गेल्यावर मंदिराचा जवळपास 25 फूट उंच गाभारा, त्यातील स्वामीनारायणाची मुर्ती दिसली. पाय-या चढून वर गेल्यावर प्रवेशद्वारावरचे खांब सुरेख नक्षीकाम केलेले होते. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर उत्कृष्ट दगडी कोरीवकाम केलेला उंच घुमटाकार गाभारा दिसला. घुमटाच्या मध्यभागी छतावर स्वामिनारायणाची पद्मासनातील मुर्ती दिसली.
पुढे गेल्यावर 15 फुटी उंच स्वामिनारायणाची मुर्ती दिसली. त्या मुर्ती सभोवताली अनोख्या रंगीत कोरीवकामाचा नमुना होता. ते सर्व दृश्य डोळ्यांचे पारणे फेडणारे होते.
दर्शन घेऊन खाली आलो. प्रदक्षिणा घालताना बाहेरील भिंतींवर गजराजांच्या विविध कथा कोरलेल्या होत्या. त्यात आंधळ्यांना हत्ती कसा वाटला त्याची गोष्ट, समुद्रमंथनाची गोष्ट इ. अनेक कथा शिल्परूपात सुरेख रितीने साकारलेल्या होत्या. दगडांमधील सजीवपणा येथे प्रत्ययास आला.      
रात्री 8 वाजता तेथील Musical Fountain Show बघितला. कारंजे, प्रकाश व संगीत यांचे अनोखे मिश्रण या कार्यक्रमात होते. सृष्टीचा उत्पत्तीकार ब्रह्मा, सृष्टी चालवणारा विष्णू आणि सृष्टीचा लयकर्ता महेश ही मध्यवर्ती संकल्पना घेवून आणि मानवी जीवनाच्या जन्म, बाल, तरूण, विवाह, प्रौढ व वृद्धत्व अशा विविध अवस्थांना अनुसरून सुरेख असे नाचणारे कारंजे, संगीत व विविधरंगी लाईटस् असा संगम या कार्यक्रमात पाहायला मिळाला.



अवघ्या 25 मिनिटांमध्ये एवढ्या रंगांचे, वाद्यसंगीतांचे आणि विविध कारंजांचे मिश्रण पाहून जीव हरखून गेला.


राजीव गांधी राष्ट्रीय विज्ञान केंद्राला भेट

दुस-या दिवशी प्रगती मैदान दिल्ली येथील राजीव गांधी राष्ट्रीय विज्ञान केंद्र बघितले. विज्ञानातील प्रयोगही कसे रंजक होऊ शकतात याचा अनुभव आला. अगदी वैदिक काळापासूनचे विज्ञान ते आजचे जनुकीय शास्त्र, रोबोटिक्स, वैद्यकशास्त्र, आयुर्वेद, संगणक, प्राणीशास्त्र, भारतीय संगीत इ. अनेक पैलूंचा समावेश या भव्य 4 मजली विज्ञान केंद्रात केला गेला आहे. येथेच वैज्ञानिक 3D Show पाहून मग आम्ही बाहेर पडलो. येथील 4 तास कसे गेले ते कळलेही नाही.


भारतीय गणितशास्त्र
आयुर्वेद- महर्षी सुश्रूत कालीन दृश्य

भारतीय संगीत शास्त्राचा इतिहास


1 comment: