Saturday, December 11, 2021

Nainital Jim Corbett tour with Veena World भाग 4: नौकुचियाताल, हनुमान गढी

 

26oct21

Nainital Jim Corbett tour with Veena World

 भाग 4: नौकुचियाताल, हनुमान गढी

 

आज सकाळी 5.30 लाच जाग आली. हॉटेलमध्येच योगाभ्यास केला. हॉटेलच्या रूममध्ये बाहेर निसर्गाचे सुंदर असे दृश्य दिसत होते. सगळीकडे दिसणारे डोंगर, त्या डोंगरांमध्ये दूरवर दिसत असलेले नैनी लेक, हॉटेल उंचावर असल्यामुळे आजूबाजूच्या दिसणाऱ्या बिल्डिंगस्, शहर सारे दृश्य डोळ्यात मावत नव्हते. एक कल्पना सुचली- सकाळपासून दर दहा दहा मिनिटांनी एकाच जागेवरून फोटो घ्यायची. साडेसात वाजेपर्यंत सतत फोटो घेतले. हळूहळू दिवस कसा वर निघतो याचा सुंदर अनुभव मिळाला. सूर्यदर्शन झाले. हे सर्व चालू असताना योगाभ्यासही चालू होता. सूर्यनमस्कार ही केले. 





नंतर फ्रेश होऊन ब्रेकफास्टसाठी डायनिंग हॉलमध्ये गेलो.

टूर मॅनेजरने आजची प्रवासाची रुपरेषा समजावून सांगितली. 

ब्रेकफास्ट नंतर बाहेर गेलो आणि आजूबाजूच्या निसर्गरम्य परिसरात काही फोटोज काढले.

हॉटेलमधून बसने निघालो. आज जायचे होते नौकुचियाताल लेक पाहायला. घाटाचा रस्ता असल्यामुळे साधारण एक तासात आम्ही तेथे पोहोचलो. 

वाह... किती सुंदर आणि शांत सरोवर होते. 



तेथील लोकल गाईडने आम्हाला यासंबंधी माहिती दिली. अशी आख्यायिका आहे की हे सरोवर ब्रम्हाने निर्माण केलेले आहे येथे जवळ ब्रह्माचे मंदिर सुद्धा आहे. ब्रह्मदेवाचा मोठा मुलगा सनत नावाचा होता त्यामुळे हे सरोवर 'सनत सरोवर' या नावाने सुद्धा ओळखले जाते. 

हे सरोवर खरोखरच निसर्गप्रेमींसाठी वरदानच आहे. स्वच्छ पाणी, आजूबाजूला घनदाट असे वृक्ष, उंच डोंगर यामध्ये वसलेले हे सरोवर आहे.

या सरोवराला 9 कॉर्नर आहेत. हे नऊ कॉर्नर्स आतापर्यंत कोणालाही शोधता आले नाहीत. जो व्यक्ती हे नऊ कॉर्नर शोधून काढील त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील तसेच त्याला मोक्ष मिळू शकेल अशी आख्यायिका आहे.

हे सरोवर 983 मीटर×693 मीटर एवढे विस्तीर्ण पसरलेले आहे तर याची खोली 40 मीटर आहे.

येथे या सरोवरात फिरण्यासाठी आम्ही शिकारा बोट मध्ये बसलो. जवळपास एक तास आम्हाला त्या बोटमन ने फिरवले. स्वच्छ पाणी, आजूबाजूचा रम्य निसर्ग, दाट झाडी हे सर्व सौंदर्य डोळ्यात सामावत आम्ही दंग झालो.

हा शिकारा राईड चा अनुभव खूपच सुखकारक होता.



तिथून परत आल्यानंतर काही वॉटर स्पोर्ट्स मध्ये भाग घेतला.

तिथून बाहेर आल्यानंतर बाजूच्या हॉटेलमध्ये मॅगी खाल्ली आणि कॉफी घेतली.

तेजस तिथून पॅराग्लायडिंग साठी निघून गेला.

आम्ही परतीच्या मार्गावर हनुमान गढीला थांबलो. हे मंदिर भीमताल नौकुचियाताल मार्गावर आहे

येथे 52 फूट उंच हनुमानाची मूर्ती आहे. याशिवाय खाली छान गुहा तयार केलेली आहे. तसेच ध्यान मंदिर, रामदरबार मंदिर, शनि मंदिर, वैष्णोदेवी मंदिर अशी अनेक मंदिरे आहेत. हे ठिकाण 1950 मध्ये संत निम करोली बाबांनी बांधले आहे. येथील ध्यान मंदिरात बसून आम्ही दहा मिनिटे ध्यानाचा अनुभव घेतला. छान वाटले. स्टीव्ह जॉब्स, मार्क झुकेरबर्ग, लॅरी पेज, जुलिया रॉबर्टस हे नीम करोली बाबा यांचे फॉलोवर्स असल्याचे कळाले. 




आमचे दर्शन वगैरे सर्व होईपर्यंत तेजस आम्हाला येऊन जॉईन झाला. त्याने पॅराग्लायडिंगचे रोमांचकारी अनुभव सांगितले. 



तिथून आम्ही एक वाजता परत निघालो. छोटा नेक आणि किमया यांच्याशी खूप दोस्ती झाल्यामुळे ते दोघेही आमच्या समोरच्या सीटवर बसायला येत होते आणि खूपच धिंगा मस्ती करत होते. लहान मुलांमध्ये खूपच प्रचंड शक्ती असते सतत ते काही ना काही तरी ऍक्टिव्हिटीज करत असतात. नेकला इंग्रजी शब्द ऐकल्यानंतर त्याचे स्पेलिंग कसे तयार करायचे हे खूप छान जमत होते. वास्तविक पाहता कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून शाळा बंद होती तरीही त्याच्या आई-बाबांनी त्याची तयारी करून घेतली असे दिसत होते आणि हसत खेळत तो ते तयार करत होता. किमया सुद्धा तेवढीच हुशार, तिला तर बऱ्याच कविता, गाणी पाठ होती.

 कमालच आहे नवीन पिढीची आम्हाला तर या वयात नाक सुद्धा पुसता येत नव्हते. काही वेळ तर त्यांचे डिस्कशन असे चालू होते की भविष्यात मी काय बनणार यावर.

नेक म्हणत होता की मी बिल्डर बनणार आणि किमया म्हणत होती मी डॉक्टर बनणार आणि प्रत्येकाने आपले क्षेत्र कसे चांगले आहे हे पटवून द्यायला सुरुवात केली. मी तर डोक्याला हातच लावला. 

या बच्चेकंपनी मुळे प्रवासात वेळ कसा गेला ते कळलेच नाही. आम्ही दुपारी दोन वाजता भीमताल च्या हॉटेलमध्ये परत आलो. 

लंच घेतल्यानंतर चक्क दोन तास विश्रांती घ्या असे आम्हाला टूर मॅनेजरने सांगितले. म्हणजे दगदग न करता आरामात आमची टूर घडून यावी हाच विणा वर्ल्ड चा प्रयास होता. सायंकाळी पाच वाजता आम्हाला त्यांनी हॉटेलच्या लॉनवर बोलावले. तेथे संगीत खुर्ची आणि इतर बरेच गेम्स आम्ही खेळलो आणि एन्जॉय केले. आमच्यासोबत पुण्याचे अमोल सर होते, खूप ब्रिलियंट माणूस. त्यांनी काही पझल चॅलेंज गेम्स घेतले. रात्री थंडी बर्‍यापैकी जाणवत होती मग आम्ही हॉटेलमध्ये परत आलो. डिनर घेतले. टूर मॅनेजरने पुढच्या दिवसाचे नियोजन सांगितले. उद्या आम्हाला जिम कॉर्बेट नॅशनल पार्क कडे प्रयाण करायचे होते.

No comments:

Post a Comment