Saturday, December 11, 2021

Nainital Jim Corbett tour with Veena World भाग3: नैनिताल दर्शन

 

25oct2021
Nainital Jim Corbett tour with Veena World
भाग3: नैनिताल दर्शन

 

सकाळी आमच्या टूर मॅनेजरचा वेकअप कॉल आला. उठलो तर रुमच्या खिडकीतून निसर्गरम्य असे डोंगर आणि त्यामध्ये असलेले सुंदर असे तळे दिसले. नंतर असे कळले की या तळ्याचे नाव नैनी लेक आहे. 


फ्रेश झालो. नाश्ता तयारच होता. नाश्ता करून खाली आलो. वातावरणात थंडी होतीच. आजूबाजूचा मनमोहक निसर्ग पाहून डोळ्याचे पारणे फिटून गेले. तेथे काही फोटोज काढले. नंतर नुसत्या डोळ्यांनी निसर्गाचा आस्वाद घेतला. सकाळी नऊ वाजता भीमताल वरून उंच असलेल्या ठिकाणाकडे म्हणजे नैनितालकडे प्रवास सुरू केला. जाताना बसमधून डोंगर-दऱ्या, सुंदर असा निसर्ग पहात गेल्यामुळे वेळ कसा गेला कळालेच नाही. 


साधारण सव्वा दहा वाजता नैनीतालला पोहोचलो. नैनिताल हे नाव नैना देवीवरून पडले आहे. उत्तराखंड राज्यातील नैनिताल हा असा एक जिल्हा आहे ज्यामध्ये जास्तीत जास्त सरोवरे आहेत. नैनीतालचा दक्षिणेकडील भाग आहे त्याला तल्लीताल असे म्हटले जाते आणि उत्तरेकडील उंच भाग आहे त्याला मल्लीताल असे म्हटले जाते. नैनिताल मध्ये मॉल रोड नावाचा मुख्य रस्ता आहे. नैनिताल मध्ये नामांकीत शिक्षण संस्था आहेत जेथे अमिताभ बच्चन सारख्या काही प्रसिद्ध लोकांचे शिक्षण झाले आहे.

इ. स. 1880 मध्ये मोठे landslip झाले होते. त्यामुळे हे शहर बऱ्याच अंशी नष्ट झाले होते. यावेळी ब्रिटिशांनी हे शहर पुन्हा वसवले. येथील मॉल रोड चे 2 भाग आहेत- वरचा आणि खालचा.

 खालचा मॉल रोड नैनी सरोवराच्या बाजूने जातो. इंग्रज लोक या रोड वरून सायकल रिक्षामध्ये किंवा घोडागाडीत ऐटीने जायचे. त्यामुळे या ठिकाणी सायकल रिक्षा राइड चे महत्त्व आहे. साधारण दहा मिनिटांचे हे सायकल रिक्षा राईड असते. ते त्याच्यासाठी फक्त वीस रुपये भाडे आकारतात. यासाठी पर्यटकांना रांगेमध्ये उभे राहावे लागते नंतर क्रमाक्रमाने रिक्षामध्ये बसवले जाते. 

आम्ही नैनिताल मध्ये पोहोचण्याच्या तीन चार दिवस आधीच येथे महापूर आला होता त्यामुळे येथील जनजीवन उध्वस्त झाले होते. येथील बरेच व्यवसाय पर्यटकांवर अवलंबून असल्यामुळे पर्यटक नसल्यानंतर त्यांचे उत्पन्न कमी होते. परंतु मागील दोन दिवसात येथील सर्व व्यवसाय सुरळीत चालू झाले होते. सायकल रिक्षा राईड साठी रांगेमध्ये असताना तेथे भिंतीवर मला एक कविता वाचायला मिळाली. कुणीतरी स्थानिक कवीने ही कविता लिहिलेली होती. नैना देवीचा आशीर्वाद आधीपासूनच असल्यामुळे सर्व शहर एवढ्या मोठ्या महापुरापासून सुरक्षित राहिले असा त्या कवितेचा आशय होता.



थोडा वेळाने आम्ही सायकल रिक्षात बसलो. रिक्षावाल्याने नैनी सरोवराच्या काठाने आम्हाला सुंदर फेरफटका घडविला. 

त्यानंतर आम्ही Ropeway च्या ऑफिस मध्ये गेलो. वीणावर्ल्ड कंपनीने आधीच आमचे टाईम स्लॉट बुकिंग केले होते. त्यामुळे आमचा वेळ वाचला. 


ग्रुप मधील आम्ही सर्व 14 जण एकाच केबल कार मध्ये बसून उंचावर गेलो. हा खूप सुंदर अनुभव होता. केबल कार मधून नैनिताल शहर पहावयास मिळत होते. शहरातील फुटबॉलचे मैदान, नैनी लेक, अनेक मंदिरांचे कळस, मज्जिद, दूरवर पसरणाऱ्या डोंगरांच्या रांगा असे हे सुंदर दृश्य आमच्या डोळ्यात मावत नव्हते. 

आम्ही केबल कार मधून वरती उतरलो. 

आता आम्ही समुद्रसपाटीपासून 2270 मीटर उंचीवर होतो. आमच्या टूर मधील सर्वात उंच ठिकाण आम्ही गाठले होते. थोडेसे चालत जाऊन स्नो व्यू पॉइंट पहावयास गेलो. वाह! सुंदर दृश्य! आम्ही आता येथून हिमाच्छादित हिमालय पर्वत रांग बघत होतो. साधारण 300km लांब पर्वत रांग आम्ही तेथे असलेल्या दुर्बीणीतून सुद्धा बघितली. त्रिशूल शिखर, नंदा देवी तसेच नंदा कोट यांची शिखरे आम्ही बघितली. साधारण वीस रुपये प्रति व्यक्ती दुर्बिणीतून बघण्याचे घेतात. 




तेथे गन शूटिंग स्पॉट्स सुद्धा होते. काही दूर तर काही जवळ असणाऱ्या वस्तूंचे तुम्हाला शूटिंग करता येते. शूटिंगसाठी प्रतिव्यक्ती 30 रुपये असा साधारण दर असतो. 

थोड्यावेळाने आम्ही रोप वे च्या ऑफिस कडे परत आलो. तेथील हॉटेलमध्ये छान बुर्‍हाण शरबत घेतले. कुमाऊ भागातील वैशिष्टपूर्ण असा पेहराव घालून फोटोज काढले. 

नंतर रोप वे च्या ऑफिस मध्ये येऊन बसलो. थोडावेळ वेटिंग करून नंतर रोप वे ने खाली परत आलो. रोप वे ने खाली येताना सुद्धा पूर्ण नैनिताल शहर खूप सुंदर दिसत होते. 

दुपारी आम्ही Hotel Chevron Fairhavens येथे Lunch साठी गेलो. खूप जुने म्हणजे 1920 ची स्थापना असलेले हे सुंदर हॉटेल. ब्रिटिश साम्राज्याची आठवण करून देणारी इमारत, समोर विविधरंगी फुलांची झाडे असणारी निसर्गरम्य अशी सुंदर बाग. 

येथे अनेक फिल्मी तारे, टीव्ही कलाकार, नॅशनल जिओग्राफिक चैनल चे प्रतिनिधी येतात असे आमच्या टूर मॅनेजरने सांगितले. कोई मिल गया, किसना इत्यादी सिनेमाचे शूटिंग येथे झाले आहे. 

हॉटेलमधील अंतर्गत रचना, डायनिंग हॉल पारंपारिक ब्रिटिश पद्धतीची होती. येथील जेवणही चवदार होते. 

जेवणानंतर आम्ही गार्डनमध्ये फोटोज काढले. वीणा वर्ल्ड मधील ग्रुपचा एक छान फोटो घेतला. 




साधारण दुपारी अडीच वाजता आम्ही नैनिताल येथील प्रसिद्ध नैनीलेक येथे बोटिंग साठी पोहोचलो.

नैनी लेक हे किडनीच्या आकाराचे किंवा चंद्रकोर प्रमाणे आहे. हे 120 एकर जागेमध्ये पसरलेले आहे तर साधारण 99 फूट खोल आहे आणि हे सात मोठ्या पर्वतांनी वेढलेले आहे. 

सध्या नुकतेच येथे पूर येऊन गेल्यामुळे पर्यटकांची संख्या कमी होती. त्यामुळे आम्हाला लवकर बोट मध्ये बसायला मिळाले. थंडी तशी फार नव्हती, उलट आजूबाजूने येणारे वारे शरीराला सुखकर वाटत होते. जवळपास अर्धा तास आम्ही बोट मध्ये फेरी मारली. बोटमन ने आम्हाला लेकच्या किनाऱ्याने, मध्यभागी सगळीकडून फिरवून आणले. निळेशार पाणी, आजूबाजूचे डोंगर, नैनिताल शहर, नैनी देवीचे मंदिर, विविध प्रकारचे वृक्ष, आकाशात असणारा ढगांचा समुदाय हे सर्व पाहून मन मोहून गेले. टूर मधील सहकाऱ्यांच्या बोटी वेगवेगळ्या होत्या आम्ही भरपूर फोटोज आणि व्हीडिओज काढले. छोटा नेक आणि छोटी किमया हे दोघेही त्यांच्या बोटीमध्ये मज्जा करत होते, त्यांचेही व्हिडिओज काढले. 







 

बोट मधून सैर झाल्यानंतर वातावरण थंड वाटत होते त्यामुळे छानसा चहा घेतला.

नंतर नैना देवी च्या मंदिरात गेलो. तेथे दर्शन घेतले. अशी आख्यायिका आहे की सतीच्या शरीराचे जे विविध तुकडे झाले होते त्यापैकी सतीचा डोळा येथे पडला होता म्हणून हे मंदिर 52 शक्तीपीठापैकी एक मंदिर मानतात. त्या मंदिराच्या परिसरात इतरही काही मंदिरे आहेत.

मंदिराच्या परिसरामध्ये नैनी लेक मधून येणारी थंड हवा लागत होती आणि तेथून नैनी लेकची दृश्य खूप सुंदर दिसत होती. 



साधारण साडेतीन वाजता आम्ही मंदिरातून बाहेर पडलो. तेथील मागच्या हॉटेलमध्ये मोमोज खाल्ले. त्यानंतर वीणावर्ल्ड कडून आम्हाला दोन तास शॉपिंग साठी फिरू शकता म्हणून सांगितले गेले. 

 तेथे जवळच तिबेटीयन मार्केट आहे तेथून आम्ही काही थरमल्स खरेदी केले. नैनिताल मधील मार्केट मध्ये वॅक्स कॅन्डल्स विविधरंगी आणि विविध आकारात सुंदर मिळतात. गुप्ता आणि मेहरोत्रा ही दोन दुकाने त्यासाठी प्रसिद्ध आहेत. मेहरोत्रा च्या दुकानात विविध प्रकारच्या कॅन्डल्स होत्या परंतु त्यांचे रेट्स थोडेसे जास्त वाटले. गुप्तांच्या दुकानांमध्ये कॅन्डल्स चे प्रकार कमी परंतु किंमती व्यवस्थित वाटल्या. तेथून खरेदी केली. नैनितालची बाल मिठाई प्रसिद्ध आहे तिची चव घेतली. नंतर काही जॅकेट्स खरेदी केले.

सायंकाळी सहा वाजता आम्ही नैनिताल हुन निघून परत भीमतालला हॉटेलमध्ये आलो.

रात्री डिनर झाल्यानंतर हॉटेल मधील कॉन्फरन्स हॉल मध्ये डान्स पार्टी एन्जॉय केली.

No comments:

Post a Comment